Tue, Jul 16, 2019 09:36होमपेज › Solapur › चला, जि.प. कॉन्वेन्ट शाळेत मुलांना प्रवेश घेऊ

चला, जि.प. कॉन्वेन्ट शाळेत मुलांना प्रवेश घेऊ

Published On: Sep 10 2018 1:18AM | Last Updated: Sep 09 2018 8:58PMटिपणी : संतोष आचलारे

जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात येणार्‍या आदर्श शिक्षक पुरस्काराचे थाटात वितरण नुकताच पार पडले. या कार्यक्रमात पुरस्कारप्राप्त शिक्षकांच्या पाठीवर थाप मारण्याचे काम तर करण्यात आलेच. पण त्यापलीकडे जाऊन शिक्षकांकडून समाजाच्या काय अपेक्षा आहेत, याबाबत सविस्तर ऊहापोह झाला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी तर क्षणभर राग आला तरी चालेल पण शिक्षकांची कानउघडणी करायचीच असा निर्धार केल्याचे दिसून आले. 

50 हजार रुपये पगार घेणार्‍या शिक्षकांची मूले कॉन्वेन्ट शाळेत जात असल्याने या विषयाचे डॉ. भारुड यांनी चांगलेच सोशल ऑडीट केले. ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणार्‍या गोरगरिबांच्या शैक्षणिक भवितव्याबद्दल त्यांची तळमळ यातून स्पष्ट दिसून आली. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकूनच आयएसएस झालेले डॉ. भारुड यांच्याकडून ही अपेक्षा रास्तच होती. अलीकडच्या दहा ते वीस वर्षात अत्यंत गुणवत्तायुक्त शिक्षकांची नेमणूक जि.प. शाळेत करण्यात आली आहे. बहुतेक शिक्षक पदवीधारक व उच्च पदवीधारक आहेत. या शिक्षकांकडून खासगी शाळेसारखेच जिल्हा परिषद शाळेत ज्ञानदान होत आहे. त्यामुळेच आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी संख्या वाढत आहे. ज्या शिक्षकांना पुरस्कार मिळाला नाही, त्यातील हजारो शिक्षक पुरस्कार मिळालेल्या शिक्षकापेक्षाही चांगले काम केले आहेत, ही वस्तूस्थिती आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या ज्ञानदानाबद्दल आता फारशी शंका उरली नाही. 

मात्र हजारो व लाखो रुपये पगार घेणारी शिक्षक जोडपी आपल्या मुलास कॉन्वेन्ट शाळेत घालतात, ही वस्तूस्थिती आहे. खासगी शाळेत केवळ आठ दहा हजार रुपयांपर्यंत वेतन असणार्‍या शिक्षकांकडून ज्ञानदान होते. मास्तरकीची पदवी घेऊन बेकार होऊन बाहेर पडलेल्या शिक्षकांचा गैरफायदा खासगी इंग्रजी शाळा घेत आहेत. दरवर्षी अशा शाळांकडून शिक्षकांची बदली करण्यात येते. वर्षभरात काम केल्यानंतर जेमतेम सहा महिन्याचाही तुटपुंजा पगार अशा शिक्षकांना देण्यात येत नाही. अशा परिस्थितीत गुणवत्ता अंगी असतानाही या शिक्षकांची मनापासून ज्ञानदान करण्याच्या इच्छेला आपोआप लगाम लागतो. त्यामुळे शिक्षकांसह सर्वच राजकीय, सामाजिक व सरकारी नोकरीतील व्यक्तींनी आपल्या मुलास जिल्हा परिषद शाळेत घालून या शाळेलाच कॉन्वेन्ट शाळेचा दर्जा दिल्यास खर्‍या अर्थाने गावांचा व पुढील पिढीचा विकास होईल, यात कोणतीही शंका नाही.