Mon, Jul 22, 2019 13:42होमपेज › Solapur › ऑपरेशन सक्सेस; बट पेशंट इज डेड...

ऑपरेशन सक्सेस; बट पेशंट इज डेड...

Published On: Aug 13 2018 1:21AM | Last Updated: Aug 12 2018 9:07PMटिपणी : संतोष आचलारे

मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणार्‍या जिल्हा परिषदेकडून शिक्षण व आरोग्य या दोन योजनेसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करुन या सुविधा ग्रामीण भागातील नागरिकांना देण्यात येतात. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी या पदाच्या खुर्चीवर आयएएस व डॉक्टर असलेले डॉ. राजेंद्र भारुड असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना व जनावरांना किमान आरोग्याच्या सुविधा मिळण्याची अपेक्षा होती. मात्र आरोग्य विभागात केवळ कांही चांगले उपक्रम यशस्वी होत असून रुग्णांची मात्र औषधोपचाराअभावी हेळसांड होत असल्याने डॉ. भारुड यांचे काम म्हणजे ऑपरेशन सक्सेस बट, पेशंट इज डेड असेच ठरत आहे. 

आरोग्य विभागाकडे औषधांसाठी तरतूद असलेला सुमारे 70 लाखांचा निधी अजूनही खर्च झाला नाही. पशुसंवर्धन विभागाचीही तीच परिस्थिती आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक व जनावरांना जिल्हा परिषदेच्या दवाखान्यातून रिकाम्या हाती उपचाराविना केवळ दोन गोळ्या घेत परतावे लागत आहे. औषधांचा पुरवठा करणार्‍या कंपनीने औषधे पुरविणे बंद केल्याचे कारण सातत्याने सांगण्यात येत आहे, मात्र यावर आतापर्यंत तोडगा काढून गरिबांसाठी व जनावरांसाठी किमान आवश्यक औषधांचा पुरवठा होणे गरजेचे होते. आषाढी वारीत डॉ. राजेंद्र भारुड व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांच्या नेतृत्वाखाली वारकर्‍यांना चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न झाला. मोबाईल रुग्णवाहिका व अ‍ॅटॅकवरील प्राथमिक उपचार या दोन्ही उपक्रमाचेही कौतुक झाले. आषाढीत आरोग्य विभागाला चांगले काम करण्यात यश आले. 

मात्र ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रावर येणार्‍या रुग्णांना किमान आरोग्याच्या सुविधा देण्यात अजून तरी जिल्हा परिषदेला यश आले नाही असेच म्हणावे लागेल. बहुतांशी आरोग्य केंद्रावर डॉक्टर तर उपकेंद्रावर कर्मचारीच नसतात. अजूनही ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी व तातडीच्या प्रसंगी वैद्यकीय खासगी सेवाही उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून किमान प्राथमिक उपचार तरी मिळण्याची रास्त अपेक्षा ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी व महिलांतून व्यक्‍त होत आहे. कंत्राटी तत्वावर मध्यंतरी तज्ज्ञ डॉक्टर भरण्यात आले होते, मात्र त्यांच्याही कामाचा फारसा परिणाम दिसून येत नाही. अजूनही अनेक आरोग्य केंंद्रात डॉक्टर नाहीत, औषधे नाहीत, साधे रक्‍त व लघवी तपासण्याचीही सुविधा नाही, केवळ शिपाई किंवा नर्सने दिलेल्या दोन गोळ्यावर होणारा उपचार बंद होणे गरजेचे आहे.