होमपेज › Solapur › रस्ते व घरकूल बांधणीच्या कामांना वेग द्या : संजय शिंदे

रस्ते व घरकूल बांधणीच्या कामांना वेग द्या : संजय शिंदे

Published On: May 14 2018 11:15PM | Last Updated: May 14 2018 10:54PMसोलापूर : प्रतिनिधी

प्रधानमंत्री ग्राम सडक योजना व घरकूल योजनेतील अपूर्ण असणारी कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत, ज्या तालुक्यात काम कमी आहे त्या गटविकास अधिकार्‍यांना नोटिसा देण्याचा आदेश  जि.प. अध्यक्ष संजय शिंदे यांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या जिल्हा नियामक मंडळाच्या बैठकीत  दिला. 

जिल्हा दक्षता व सनियंत्रण समितीची सभा जि.प. अध्यक्ष संजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेच्या सभागृहात घेण्यात आली. यावेळी आ. बबनदादा शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अनिलकुमार नवाळे, सदस्य प्रेरणा खंदारे यांच्यासह संबंधित विभागाचे खातेप्रमुख व गटविकास अधिकारी उपस्थित होते. 

घरकुल योजनेत सोलापूर जिल्हा राज्यात तिसर्‍या क्रमांकावर राहिला आहे. मे महिन्याअखेरपर्यंत सोलापूर जिल्हा राज्यात या योजनेत पहिल्या क्रमांकावर आणण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे डॉ. भारुड यांनी यावेळी सांगितले. 

सोलापूर जिल्ह्याला दिलेल्या 13 हजार 29 घरकुलांपैकी 10 हजार 232 घरकुलांचे काम पूर्ण करण्यात आले आहे. उर्वरित 2797 घरकुलांचे काम प्रगतीपथावर असल्याचे यावेळी सांगण्यात आले. 
घरकुल योजनेत काम कमी असणार्‍या गटविकास अधिकार्‍यांना नोटिसा देण्यात याव्यात, त्यांच्यात सुधारणा न झाल्यास त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, असे आदेश यावेळी संजय शिंदे यांनी दिले. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतील अपूर्ण असलेल्या दोन रस्त्यांचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे, असेही आदेश त्यांनी यावेळी दिले. 

पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेंतर्गत घरकुल बांधण्यासाठी ज्या लाभार्थ्यांना जागा नाही अशा 8 लाभार्थ्यांना जागा खरेदी करण्यासाठी प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत देण्यात आली आहे. या योजनेसाठी आणखीन 60 प्रस्ताव असून यावर लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. जागा खरेदी करण्यासाठी आलेल्या प्रस्तावांना तातडीने मंजुरी देण्यात यावी, अशी सूचना यावेळी शिंदे यांनी केली.

चालू आर्थिक वर्षात सोलापूर जिल्ह्यासाठी पंतप्रधान आवास योजनेसाठी शासनाकडून 2 हजार 53 घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. या योजनेतूनही तातडीने तीन दिवसांत प्रशासकीय मंजुरी देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.  घरकुल योजनेसाठी लाभार्थी निवड झाल्यानंतर वर्षाच्या आत लाभार्थ्यांने घरकुल पूर्ण करणे आवश्यक आहे. ज्या लाभार्थ्यांनी विहीत मुदतीत घरकुल पूर्ण केले नाही त्यांना अनुदान देण्यात येणार नाही, अशी माहिती यावेळी देण्यात आली. 

घरकुलसंदर्भातील प्रत्येक माहिती ऑनलाईन असल्याने लाभार्थ्यांना विहीत मुदतीत घरकुलाचे काम पूर्ण करावेच लागणार आहे. ज्या लाभार्थ्यांना वाळूची अडचण आहे अशा लाभार्थ्यांना राज्य शासनाच्या आदेशानुसार पंचायत समितीमार्फत वाळू उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचेही यावेळी अनिलकुमार नवाळे यांनी सांगितले. यावेळी विविध खात्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

आमदार व खासदारांची दांडी 
केंद्र पुरस्कृत योजनांचा आढावा घेण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार नियामक मंडळ स्थापन करण्यात आले आहे. जि.प. अध्यक्ष व एक ज्येष्ठ खासदार अशा दोन अध्यक्षांच्या उपस्थितीत स्वतंत्र सभा घेण्यात येतात. या सभेस सर्व आमदार व खासदार सदस्य असतात. मात्र जि.प. अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात येणार्‍या सभेस आमदार व खासदार नेहमीच दांडी मारत असल्याचे दिसून येत आहे.