सोलापूर : संतोष आचलारे
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा प्रभारी अध्यक्ष निवडीवरुन गुरुवारी राजकीय शीतयुध्दाचे राजकारण दिसून आले. अध्यक्ष संजय शिंदे यांच्या गैरहजेरीत स्थायी समितीसाठी उपाध्यक्ष शिवानंद पाटील उपस्थित होते. मात्र असे असतानाही अर्थ व बांधकाम समितीचे सभापती विजयराज डोेंगरे यांना स्थायी समितीचे सभापती केल्याने राजकीय चर्चेला उधाण निर्माण झाले आहे.
गुरुवारी स्थायी समितीची सभा आयोजित करण्यात आली होती. नियमानुसार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हे या समितीचे अध्यक्ष असतात. यादिवशी अध्यक्ष संजय शिंदे दुपारपर्यंत सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत होते. मात्र करमाळा येथील बाजार समितीच्या निवडणुकीच्या सभेसाठी त्यांनी दुपारीच आपला ताफा पुन्हा करमाळ्याकडे वळविला. स्थायी समितीसाठी अध्यक्ष हजर नसताना उपाध्यक्ष हजर असल्यास त्यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा घेणे क्रमप्राप्त आहे. संजय शिंदे यांच्या सूचनेनुसार सभापती डोेंगरे यांना स्थायी समितीचे अध्यक्ष करण्यात आले. स्थायी समितीच्या सभेस उपाध्यक्ष पाटील हे उशिरा आल्याने सभापतीमधून हंगामी सभेचा अध्यक्ष निवडला गेल्याची माहिती सभेनंतर पत्रकारांना देण्यात आली.
अध्यक्षपदाच्या निवडीसाठी अक्कलकोटचे आमदार सिध्दाराम म्हेत्रे यांनी जिल्हा परिषदेतील दोन सभापतीपदाची मागणी करुन महायुतीच्या अध्यक्षपदाच्या निवडीला पाठिंबा दिला होता. त्यामुळे ठरल्याप्रमाणेच आ. म्हेत्रे यांच्या शिफारशीवरुन काँग्रेसचे मल्लिकार्जुन पाटील यांना कृषी व पशुसंवर्धन सभापतीपद, तर माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांचे चिरंजीव शिवानंद पाटील यांना उपाध्यक्षपदावर निवड करण्यात आली. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीपासून आ. सिध्दाराम म्हेत्रे व माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांच्यात राजकीय धुसफूस झाल्याची चर्चा आहे. त्यामुळेच याची लागण जिल्हा परिषदेच्या राजकीय पटलावर झाल्याचीही चर्चा आहे. आगामी विधानसभा व लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महायुतीच्या माध्यमातून निवडणुका लढविण्याचा चंग बांधून, त्याची सुरुवात आतापासूनच झाल्याचे दिसत आहे.
जि.प. स्थायी समितीच्या सभेनंतर प्रभारी अध्यक्ष विजयराज डोंगरे यांनी त्यांच्या कक्षात पत्रकारांना सभेची माहिती देत होते. यावेळी उपाध्यक्ष शिवानंद पाटील काही वेळाने आले, मात्र अवघ्या काही मिनिटातच त्यांनी येथून काढता पाय घेतल्याने, त्यांची नाराजी दिसून आली.