Thu, Jul 18, 2019 15:21होमपेज › Solapur › ‘त्या’ पोलिस अधिकार्‍याच्या पत्नीची आत्महत्या नव्हे खून

‘त्या’ पोलिस अधिकार्‍याच्या पत्नीची आत्महत्या नव्हे खून

Published On: Jan 28 2018 10:16PM | Last Updated: Jan 28 2018 10:02PMयेरमाळा : प्रतिनिधी 

येथील पोलिस स्टेशनचे सपोनि विनोद चव्हाण यांच्या पत्नी मोना चव्हाण यांची आत्महत्या नसून खून असल्याची तक्रार मोनाचे वडील शेषांक जालिंदर पवार यांनी येरमाळा पोलिसांत दिली आहे. हुंड्यातील पाच लाख रुपये आणण्यासाठी मोनाचा छळ आणि जाच सुरू होता, त्यासाठीच पतीने खून केला असून, या कटात सासरची मंडळी सहभागी असल्याची तक्रार मोनाच्या वडिलांनी फिर्यादीत म्हटले आहे. 

यावरून पती विनोद चव्हाण यांच्यासह सासरच्या मंडळीविरुद्ध भादंवि 302, 498, 34 नुसार येरमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येरमाळा पोलिस स्टेशनचे सपोनि विनोद चव्हाण यांची पत्नी मोना हिने 25 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता भाडोत्री घरात गोळी झाडून आत्महत्या केली  अशी चर्चा होती. ही आत्महत्या नसून खून असल्याची तक्रार मृत मोनाचे वडील शेषांक जालिंदर पवार यांनी येरमाळा पोलिस स्टेशनमध्ये दिली आहे. 

बीड जिल्ह्यातील शिरूर कासार पोलिस स्टेशनमध्ये हेडकॉन्स्टेबल असलेले शेषांक जालिंदर पवार यांना दोन मुले आणि दोन मुली आहेत. सध्या येरमाळा पोलिस स्टेशनमध्ये सपोनि असलेले विनोद चव्हाण हे बीड जिल्ह्यातील चौसाळा येथील आहेत. मोना आणि विनोद चव्हाण यांचा विवाह 28 नोव्हेंबर 2014 रोजी झाला होता, लग्नात सासरच्या मंडळीनी 14 लाख हुंडा आणि 7 तोळे सोन्याची मागणी केली होती पण ती बोलणी फिस्कटली होती, नंतर सात लाख हुंडा आणि पाच तोळे सोने देण्याचे ठरले होते, मात्र लग्नाच्या वेळी 2 लाख हुंडा आणि दीड तोळे सोने देण्यात आले, बाकीचे नंतर देण्याचे ठरले होते, लग्नानंतर उर्वरित पाच लाख हुंड्यासाठी मोना हिचा सासू, सासरे, चुलत सासू सासरे आणि पती विनोद चव्हाण हे छळ आणि जाच करीत होते, याच कारणासाठी मोना हिचा 25 जानेवारी रोजी खून करण्यात आला, असे तक्रारीत म्हटले आहे. उपाधीक्षक नितीन कटेकर तपास करीत आहेत.