Thu, Jan 17, 2019 11:00होमपेज › Solapur › चुकीच्या बदलीस न्यायालयाकडून स्थगिती

चुकीच्या बदलीस न्यायालयाकडून स्थगिती

Published On: Dec 19 2017 2:06AM | Last Updated: Dec 18 2017 9:09PM

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

सार्वजनिक आरोग्य विभागातील उपसचिव, संचालक, उपसंचालक यांनी बदल्यांचा कालावधी नसताना व कर्मचार्‍यांचा विनंती अर्ज नसताना आपापसांत चुकीच्या पध्दतीने बदल्या केल्या आहेत. त्याविरोधात अन्यायग्रस्त कर्मचार्‍याने औद्योगिक न्यायालयात धाव घेतली असून औद्योगिक न्यायालयाने या बदलीस स्थगिती दिली आहे. 

 सार्वजनिक आरोग्य विभागातील अधिकार्‍यांनी 15 नोव्हेंबर 2017  रोजी बदल्यांचा कालावधी नसताना तसेच बदल्यांमधील कर्मचार्‍यांचे विनंती अर्ज नसताना सोलापूर जिल्ह्यातील दोन वरिष्ठ लिपिकांच्या आपापसात विनंती बदल्या केल्या आहेत. त्याचप्रकारे सोलापूर जिल्ह्यात आणखी 20 पर्यंत कर्मचार्‍यांच्या बदल्या केल्याचे समोर येत आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य विभागाचा गैरकारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

या गैरप्रकारच्या बदल्यांमध्ये सध्या उपजिल्हा रुग्णालय, अकलूज येथील वरिष्ठ लिपिक मनिषा नागेश बंदपट्टे आणि जिल्हा क्षयरोग कार्यालयातील वरिष्ठ लिपिक माणिक नागनाथ कदम यांच्या आपापसांत विनंती बदल्या केल्या आहेत. मात्र यातील वरिष्ठ लिपिक माणिक कदम यांनी विनंती अर्ज दिलाच नव्हता. तरीही त्यांची विनंती बदली केली आहे. त्याविरोधात ते 12 डिसेंबर 2017 रोजी औद्योगिक न्यायालयात गेले आहेत. यावर औद्योगिक न्यायालयाने मूळ फिर्यादीचा निकाल लागेपर्यंत यातील कर्मचार्‍याची उपजिल्हा रूग्णालय, अकलूज येथे बदली करू नये आणि यातील 15 नोव्हेंबर 2017 रोजीच्या बदली आदेशास स्थगिती दिली आहे. 

या गैरप्रकारानंतर सार्वजनिक आरोग्य विभागाकडून सोलापूर जिल्ह्यातील आणखी 20 पर्यंत कर्मचार्‍यांच्या बदल्या केल्याचे एका वरिष्ठ अधिकार्‍याने नाव न सांगण्याच्या अटीवर दै. ‘पुढारी’ला माहिती दिली. परंतु बदल्यांचा कालावधी नसताना, विनंती अर्ज नसताना या बदल्यांचा प्रस्ताव शासनाकडे सादर कोणी केला, हाही प्रश्‍न चर्चिला जात आहे. त्यामुळे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी याचीदेखील चौकशी करून दोषींवर कडक कारवाईची मागणी केली जात आहे.