Mon, Jun 24, 2019 20:55होमपेज › Solapur › चारित्र्याच्या संशयावरून रखेलीचा खून; फळविक्रेत्यास अटक

चारित्र्याच्या संशयावरून रखेलीचा खून; फळविक्रेत्यास अटक

Published On: Feb 13 2018 10:30PM | Last Updated: Feb 13 2018 9:32PMसोलापूर : प्रतिनिधी

चारित्र्याच्या संशयावरून फळ विक्रेत्या तरुणाने रखेलीच्या गळ्यावर व पोटावर चाकूने वार करून तिचा खून केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. ही घटना शहरातील  मुल्लाबाबा टेकडीवर घडली  असून  याबाबत फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी खून करणार्‍या फळ विक्रेत्यास अटक केली आहे.

फिरोज ऊर्फ महेबूब चाँदसाब जमादार (वय 32, रा. मुल्लाबाबा टेकडी, सिद्धेश्‍वर पेठ) असे अटक करण्यात आलेल्या फळ विक्रेत्याचे नाव आहे. बिल्कीस इक्बाल शेख (40) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत फैजिदार फिरोज अन्सारी या महिलेने फिर्याद दाखल केली आहे.

बिल्कीस शेख हिचे सुमारे 18 वर्षांपूर्वी लग्न झाले असून ती नाशिक येथे पतीकडे राहात होती. तिच्या पतीस दारूचे व्यसन असल्याने ती त्याला सोडून दोन मुलांसह आई-वडिलांकडे मुल्लाबाबा टेकडी येथे राहण्यास होती. तर आरोपी  फिरोज हा चारचाकी गाडीवर फळ विक्रेता असून तोदेखील मुल्लाबाबा टेकडीवर राहतो. गेल्या 5 वर्षांपासून बिल्कीस आणि फिरोज यांच्यात अनैतिक संबंध आहेत. फिरोज हा बिल्कीसच्या चारित्र्याचा संशय घेऊन तिच्याशी वादावादी करायचा.

सोमवारी दुपारी फिरोज  बिल्कीसच्या घरी गेला होता. तिथे त्याने बिल्कीसला तुझे लफडे आहे, तू कोणाशी बोलतीस असे म्हणून त्याने बिल्कीसचा मोबाईल हिसकावून घेऊन त्यातील नंबर पाहू लागला व या नंबरवर तू कोणाशी बोलतेस म्हणून तिच्याशी वाद करू लागला होता. त्यावेळी बिल्कीसच्या आईने फिरोजला त्याच्या पँटच्या खिशातील चाकू पाहून त्याबाबत विचारले होते. त्यावेळी फिरोजने हा कलिंगड कापायचा चाकू आहे  असे सांगून तेथून निघून गेला होता.

मंगळवारी सकाळी बिल्कीस   बाथरुमकडे जात असताना फिरोजने हुसेनसाब शेख यांच्या घरासमोरच्या बोळात बिल्कीसला गाठले तिच्या गळ्यावर चाकूने वार केला. त्यामुळे बिल्कीस खाली पडली. फिरोजने चाकूने बिल्कीसच्या पोटात भोसकून तिचा जीव घेतला. त्यानंतर फिरोज तेथून पळून गेला. 

या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त अपर्णा गिते, सहायक पोलिस आयुक्त परशराम पाटील, फौजदार चावडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय जगताप फौजफाटा घेऊन घटनास्थळी आला. याबाबत फौजदार चावडी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस निरीक्षक जगताप तपास करीत आहेत.