Mon, Aug 19, 2019 01:25होमपेज › Solapur › साकत येथे महिलांनी उद्ध्वस्त केला दारूअड्डा

साकत येथे महिलांनी उद्ध्वस्त केला दारूअड्डा

Published On: Feb 18 2018 2:04AM | Last Updated: Feb 18 2018 2:04AMवैराग : प्रतिनिधी

साकत (ता. बार्शी) येथील महिलांनीच रणरागिणीचे रूप धारण करून अनधिकृत दारूअड्ड्यावर  हल्लाबोल केला असून हा दारुअड्डा उद्ध्वस्त करुन टाकला आहे. वैराग पोलिस ठाण्याच्या कार्यवाहीला न जुमानता खुलेआम दारुधंदा चालू ठेवणारे चार दारूअड्डे महिलांनी उद्ध्वस्त केले आहेत.  वारंवार अशी आक्रमक भूमिका घेऊनही दारूधंदा चालूच राहात असल्याने असे धंदे कधी बंद होणार, असा प्रश्‍न आता निर्माण झाला आहे. साकत छोटे गाव असले तरी सुसंस्कृत गाव आहे. मात्र खुलेआम दारू विक्रीमुळे या गावाची शांतता नष्ट झाली आहे. 

या दारूधंद्याविरोधात गावातील महिलांनी एकजूट करुन यल्गार पुकारला आहे. मात्र, त्यांना दारुधंदेवाले जुमानत नसल्याचे चित्र आहे. वैराग पोलिसही त्यांच्यापुढे हतबल असल्याचे दिसून येत आहे. या दारूधंद्याविरोधात कोणच ठोस भूमिका घेत नसल्याने महिलांनीच पदर खोवून आक्रमक भूमिका घेत चार दारू अड्ड्यांवर हल्लाबोल केला. या महिलांनी वारंवार वैराग पोलिस स्टेशनला दारूबंदीविषयी निवेदन देऊनही पोलिस दखल घेत नसल्याचे महिलांनी सांगितले. दारू विक्री करणार्‍या महिला या पोलिस आमचे काही करू शकत नाहीत व त्याच महिलांकडून दारू बंद करणार्‍या महिलांना शिवीगाळी व धमक्या देत असल्याचे गावातील महिलांनी सांगितले. यामुळे अनेक तरुणांचे संसार उद्ध्वस्त होत असून अनुचित प्रकारही गावात घडत आहेत. गावातील दारू विक्री बंद व्हावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्पादन शुल्क विभाग व पोलिस अधीक्षक  सोलापूर  यांना निवेदने देण्यात आली आहेत. मात्र अद्याप अजून त्यांच्याकडून कुठलीही ठोस कायदेशीर कारवाई करण्यात आलेली नाही. लवकरात लवकर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी महिला मंडळाच्या अध्यक्षा कांताताई  खटाळ यांनी केली. यावेळी नीलकंठ माने, सारिका ननवरे, सत्यशील ओहोळ, चित्रा गायकवाड, शोभा खटाळ, रंजना मोरे, मुलाणी, उषा खटाळ आदी महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.

गावातील महिलांचा आक्रमक पवित्रा
साकत गावातील महिलांना दारु विक्रीचा मोठा त्रास होत आहे. दारुमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. अनेक तरुण मुलेही दारुच्या आहारी जात असल्याचे चित्र आहे. ही दारु विक्री तातडीने बंद करावी, अशी अनेकदा मागणी करण्यात आली. मात्र प्रशासन व पोलिस या मागणीकडे गांभीर्याने पाहात नसल्याचे चित्र आहे. जोपर्यंत गावातील बेकायदेशीर दारू बंद होत नाही तोपर्यंत आम्ही गावातील सर्व महिला गप्प बसणार नाही, अशी शपथ महिलांनी घेतली आहे. महिलांचा हा आक्रमक पवित्रा पाहून दारु विक्रेत्यांचे धाबे चांगले दणाणले असल्याचे दिसून येत आहे.