सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील वाळू लिलाव सध्या बंद असल्याने खासगी कामांबरोबर आता शासकीय विकासकामांनाही फटका बसत आहे. सध्या मार्चअखेर असल्याने जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने सुरु असलेली कोट्यवधी रुपयांची कामे ठप्प झाली आहेत. मार्चअखेर असल्याने ही कामे वेळेत पूर्ण करा, असा तगादा प्रशासनाने लावला आहे. दुसरीकडे वाळू नाही काय करायचे, असा प्रश्न ठेकेदारांनी उपस्थित केला आहे.
सध्या वाळू लिलाव बंद असल्याने कोट्यवधी रुपयांची विकासकामे ठप्प झाली असून बांधकाम व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली असल्याचे निवेदन बिल्डर असोसिएशनच्यावतीने जिल्हाधिकार्यांना देण्यात आले होते. मात्र पर्यावरण विभाग आणि न्यायालयाच्या कचाट्यात सापडलेला हा वाळू लिलाव आता प्रशासनाच्या हातात राहिलेला नाही. त्यामुळे शासन स्तरावरुन यासाठी परवानगी मिळण्याची वाट सध्या जिल्हा प्रशासन पाहात आहे. दुसरीकडे या वाळू तुटवड्याचा फटका आता थेट शासकीय कामांनाच बसत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्यावतीने विविध ग्रामपंचायतींमध्ये सुरु असलेली कोट्यवधीची विकासकामे सध्या ठप्प झाली आहेत. मार्चअखेर असल्याने ही कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी तगादा लावला असला तरी ठेकेदार वाळू मिळत नसल्याने हतबल झाले आहेत. दुसरीकडे चोरीने वाळू घेण्यासाठी दामतिप्पट भाव आकारला जात आहे. त्यामुळे चोरीने चालणारी वाळू घेऊन विकासकामे पूर्ण करणे आता ठेकेदारांच्या हातात राहिले नाही. त्यामुळे किमान शासकीय कामांना तरी जिल्हा प्रशासनाने वाळू उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी आता विविध ठेकेदारांनी केली आहे. त्यावर काय निर्णय होतो, हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे.