Sat, Apr 20, 2019 08:29होमपेज › Solapur › जि.प.तील ठकसेन कर्मचार्‍यांच्या बदल्या होणार

जि.प.तील ठकसेन कर्मचार्‍यांच्या बदल्या होणार

Published On: Dec 05 2017 1:41AM | Last Updated: Dec 04 2017 10:19PM

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेत एकाच टेबलवर वर्षानुवर्षे ठकसेन झालेल्या कर्मचार्‍यांची माहिती घेण्याचे काम सुरू असून मार्च महिना संपल्यानंतर अशा कर्मचार्‍यांची उचलबांगडी निश्‍चित असल्याची माहिती जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिली. 

‘जि.प.चा मनमानी कारभार, ठेकेदारांना पोसण्याची प्रथा सुरू’ या मथळ्याखाली दै. ‘पुढारी’ने वृत्त प्रकाशित करून जिल्हा परिषदेतील ठकसेन कर्मचार्‍यांच्यावर प्रकाश टाकला होता. यानंतर जिल्हा परिषदेत शनिवारी जि.प. प्रशासनाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्‍वर राऊत यांनी कर्मचार्‍यांच्या नेमणुकीचा कालावधीची संपूर्ण माहिती घेतली. 

एकाच टेबलवर, एकाच विभागात तीन वर्षांपेक्षा जास्त काळापर्यंत कार्यरत असणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांचा संपूर्ण तपशील यावेळी कागदावर घेण्यात आला. सध्या जिल्हा परिषदेत निधी खर्च करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. मार्चअखेरपर्यंत निधी खर्च करण्यास पहिले प्राधान्य देण्यात आले आहे. अशापरिस्थितीत कर्मचार्‍यांच्या बदल्या झाल्या तर कामकाजात व्यत्यय येणार आहे. त्यामुळे अशा कर्मचार्‍यांची माहिती घेऊन एप्रिल महिन्यात त्यांची उचलबांगडी करण्याचा निर्धार करण्यात आल्याचे डॉ. भारुड यांनी सांगितले. 

शिक्षण, बांधकाम, आरोग्य, पाणीपुरवठा, वित्त विभाग, कृषी आदी महत्त्वाच्या विभागांत बदलीस पात्र असतानाही अनेक कर्मचारी व अधिकारी कार्यरत असून काही अधिकार्‍यांनी व कर्मचार्‍यांनी तर झालेली बदली रद्द करून घेऊन पुन्हा त्याच ठिकाणी आपली सोय करून घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.