Tue, Apr 23, 2019 10:13होमपेज › Solapur › गिरणी कामगारांना फसवणार्‍या बड्या धेंड्यांना अटक कधी?

गिरणी कामगारांना फसवणार्‍या बड्या धेंड्यांना अटक कधी?

Published On: Mar 17 2018 11:28PM | Last Updated: Mar 17 2018 10:22PMसोलापूर : प्रतिनिधी

सर्वसामान्य जनता, गिरणी कामगारांची फसवणूक करून गुन्हा दाखल होऊन कित्येक महिने उलटले तरी फरार असणारे शरद मुथा, अमोल सोनकवडे, सीताराम महांकाळ यांना अटक कधी करणार, असा सवाल संभाजी आरमारने निवेदनाद्वारे पोलिस आयुक्त महादेव तांबडे यांना केला आहे.

गुन्हे दाखल होऊन कित्येक महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे. मात्र, दुर्दैवाने पोलिस प्रशासनाच्या हातावर तुरी देऊन पसार होण्यास आरोपी यशस्वी झाले आहेत. विशेष म्हणजे फरार आरोपी शरद मुथा मुंबईमध्ये बसून त्याच्या नावे असलेले जमिनीचे व्यवहार संमतीपत्राद्वारे करत आहे. म्हणजे आरोपीवर गुन्हा दाखल असल्याचा कसलाच परिणाम झाला नसून त्याचे आर्थिक व्यवहार निर्धोक सुरु आहेत.
विशेष म्हणजे अमोल सोनकवडे याने आपल्या नावे असलेल्या मिळकतीचे कुलमुखत्यारपत्र त्याचा भाऊ राहुल जयप्रकाश सोनकवडे नावे केलेले असून  या कुलमुखत्यारपत्राआधारे आधीच्या विकलेल्या प्‍लॉटची दुबार विक्री सुरु आहे. गुन्हा दाखल झाल्याबरोबर तात्काळ जर मुथा व सोनकवडे यांना अटक झाली असती तर आज त्यांच्याकडून सुरु असलेल्या मिळकतींच्या व्यवहारांना अटकाव बसला असता. अशा प्रकारामुळे सर्वसामान्य जनतेचा पोलिस प्रशासन व कायद्यावरील विश्‍वास उडल्याशिवाय राहणार नाही. अशाप्रकारे गुन्हे दाखल असलेले आरोपी तपास अधिकार्‍यांशी आर्थिक संधान साधल्यामुळेच आरोपी मोकाट आहेत, अशी शंका वाटते.

शहरातील कायदा सुव्यवस्थेपुढे आव्हान निर्माण करणार्‍या वरील सर्व आरोपींना सोलापूर शहरातील जनतेचा कायद्यावरील विश्‍वास उठण्यापूर्वी अटक झाली नाही तर संघटनेला नाईलाजास्तव पोलिस महासंचालकांकडे दाद मागावी लागेल, असा इशारा संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे, कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे, जिल्हाप्रमुख गजानन जमदाडे, शहरप्रमुख शशीकांत शिंदे, संतोष कदम, संजय सरवदे, संगप्पा म्याकल आदींनी दिला आहे.

Tags : solapur, solapur news, cheat mill workers, Absconded not arrested, solapur police, shard mutha