Thu, Mar 21, 2019 15:27होमपेज › Solapur › लग्‍नाच्या आमिषाने विद्यार्थिनीचा विनयभंग

लग्‍नाच्या आमिषाने विद्यार्थिनीचा विनयभंग

Published On: May 16 2018 10:15PM | Last Updated: May 16 2018 9:52PMसोलापूर : प्रतिनिधी

लग्नाचे आमिष दाखवून विद्यार्थिनीचा विनयभंग करून तिची फसवणूक करणार्‍या शिक्षकाविरुद्ध विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवानंद महादेव बगले (रा. माळकवठा, ता. दक्षिण सोलापूर) असे गुन्हा  दाखल  झालेल्याचे शिक्षकाचे नाव  आहे. याबाबत   पीडित  विद्यार्थिनीने  फिर्याद दाखल केली आहे. यातील पीडित विद्यार्थिनी ही मजरेवाडी परिसरातील एका शाळेत शिकत होती. त्यावेळी शिवानंद बगले हा  त्या   शाळेमध्ये  शिक्षक म्हणून आला होता. त्यावेळी  पीडित विद्यार्थिनी व  बगले यांची ओळख झाली होती. त्यानंतर ते दोघे फोनवर बोलू लागले व त्यांच्या ओळखीचे रुपांतर प्रेमामध्ये झाले. त्यानंतर  बगले यांनी आपण दोघांनी लग्न करू असे सांगून तिच्याशी जवळीकता निर्माण केली. 8 ऑक्टोबर 2016 रोजी बगले याने  त्याच्या  सुंदरम नगर येथील रुमवर पीडित विद्यार्थिनीला बोलावून घेऊन  माझे तुझ्यावर प्रेम आहे,  आपण  दोघे लग्न करु,  तुझ्यासाठी मी माझी नोकरी पण सोडून देईन असे सांगून तिच्याशी जवळीकता केली. गेल्या दीड वर्षापासून बगले याने वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिचा विनयभंग केला. विजापूर नाका ठाण्यात गुन्हा दाखल असून सहायक पो.नि. मोहिते तपास करीत आहेत.

मटका घेणार्‍यांवर कारवाई

शहरातील 70 फूट रोड आणि विजापूर रोडवर मटका घेणार्‍यांना शहर पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सुमारे 2 हजार रुपयांची रोकड जप्त केली. याबाबत सदर बझार आणि विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 70 फूट रोडवरील संत तुकाराम चौकाकडे जाणार्‍या रस्त्यावरील ओम नमकीन दुकानासमोर संतोष बसवराज भाईकट्टी (वय 36, रा. राठी कारखानासमोर, भारतरत्न इंदिरानगर, सोलापूर) यास मटका घेताना ताब्यात घेऊन 745 रुपयांची रोकड जप्त केली. भाईकट्टी हा समीर हुंडेकरी (रा. फॉरेस्ट, सोलापूर) याच्या सांगण्यावरुन मटका घेत असल्याची नोंद  झाली आहे.  विजापूर रोडवरील नडगिरी पेट्रोल पंपाजवळील पान शॉपच्या बाजूला शिवप्पा अंदाप्पा व्हनबिदगे (वय 55, रा. शिरवळ, ता. दक्षिण सोलापूर), सिध्देश्‍वर दीपक माशाळ (वय 30, रा. मदनीनगर, सोलापूर) यांना मटका घेताना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 1295 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.