Tue, Jul 16, 2019 01:41होमपेज › Solapur › शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यास मनपा उदासिन

शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यास मनपा उदासिन

Published On: Jul 06 2018 10:13PM | Last Updated: Jul 06 2018 8:53PM सोलापूर : प्रशांत माने

केंद्र शासनाने ‘अमृत’ योजनेतून मंजूर केलेल्या 42  कोटी  64 लाखांच्या निधीतून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु या कामात अक्षम्य दिरंगाई सुरु असल्याने महापालिकेला शहराचा पाणीपुरवठा करण्यात मोठी उदासिनता असल्याचेच स्पष्ट होत आहे. 42 कोटींच्या निधीतून आतापर्यंत 17 कोटींचा खर्च झाला असून 5 शटडाऊनद्वारे दुरुस्तीचे काम झालेले असून वर्कऑर्डर संपायला अवघ्या दोन महिन्यांची मुदत राहिलेली असातनाही सहाव्या शटडाऊनला मुहूर्त लागत नसल्याची शोकांतिका आहे.

‘अमृत’ योजनेतून शासनाने 42 कोटी 64 लाखांचा निधी मंजूर केल्यानंतर सोलापूर शहराला सातत्याने होणारा विस्कळीत पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी उजनी जलवाहिनी, सोरेगाव जलवाहिनीसह विविध पाणीपुरवठ्याची कामे हाती घेण्यात आली होती. मिरज येथील इंडियन ह्यूम पाईप्स (आय.एच.पी.) यांना या कामाची वर्कऑर्डर 15 ऑक्टोबर 2016 रोजी देण्यात आली होती. संबंधित ठेकेदार कंपनीने या कामात दिरंगाई केलेली असून कामात गती नाही. 42 कोटींपैकी आतापर्यंत फक्त 17 कोटींची कामे पूर्ण झालेली असून 14 ऑक्टोबर 2018 रोजी या कामाची मुदत संपत आहे.
या कामाचा प्रस्ताव तयार करताना महापालिकेचे सार्वजनिक आरोग्य अभियंता कार्यालय आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या दोन्ही कार्यालयांकडून त्रुटी राहिल्यानेदेखील या कामात आता बदल करण्यात येत असल्याची चर्चा आहे. 9 कोटी 57 लाखांची कामे नव्याने सूचविण्याची वेळ पालिका प्रशासनावर आलेली आहे. यापूर्वी उजनी जलवाहिनी व टाकळी-सोरेगाव जलवाहिनी-पंप हाऊस आदी ठिकाणच्या दुरुस्ती कामासाठी 5 वेळा शटडाऊन घेण्यात आलेले आहे. पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य अभियंता कार्यालयाने अगोदरच हे स्पष्ट केलेले आहे की, 42 कोटी 64 लाखांच्या या निधीतून दुरुस्तीसह विविध कामे पूर्ण केल्यानंतर सोलापूर शहरासाठी जास्तीचे 20 एमएलडी पाणी उपलब्ध होणार आहे. सध्या उजनी, टाकळी-सोरेगाव, हिप्परगा आदी ठिकाणांहून शहरासाठी सुमारे 150 एमएलडी पाणी दैनंदिन उचलले जाते. 20 एमएलडी अधिकचे पाणी उपलब्ध झाल्यानंतर शहराला दैनंदिन पाणीपुरवठा करणेदेखील शक्य होणार आहे. 15 जुलैच्या जवळपास उजनी जलवाहिनीवर सहावे शटडाऊन घेतल्यानंतर वॉल, एक्स्पॉन्शन जॉईंट बदलणे आदी कामे हाती घेतली जाणार आहेत. कोंडी ते बाळे अशी साडेपाच कि.मी.ची नूतन जलवाहिनी टाकण्यात आली असून याच शटडाऊनमध्ये बदलण्यात आलेली नवीन जलवाहिनी जोडली जाणार असल्याचीही माहिती मिळाली आहे.ठेकेदारास 90 लाखांचा दंड ‘अमृत’ योजनेतील 42 कोटी 64 लाखांच्या निधीतून करावयाच्या कामाचा ठेका घेतलेल्या मिरजच्या आय.एच.पी. कंपनी ठेकेदारास जुलै 2017 पासून दैनंदिन दीड लाखांचा दंड करण्यात येत आहे. या ठेकेदारास आतापर्यंत 90 लाखांचा दंड करण्यात आला आहे. 14 ऑक्टोबर 2018 पर्यंत हे काम पूर्ण न झाल्यास ठेकेदारास तीन ते साडेतीन कोटींचा दंड होण्याची शक्यता आहे.

सहाव्या शटडाऊनला लागेना मुहूर्त

‘अमृत’ योजनेतील 42 कोटी 64 लाखांच्या निधीतून 14 आक्टोबरपासून आतापर्यंत उजनी व टाकळी जलवाहिनीवर दुरुस्तीसाठी पाचवेळा शटडाऊन घेण्यात आले आहे. या कामाच्या वर्कऑर्डरची मुदत येत्या आक्टोबर महिन्यात संपत आहे. तरीदेखील सहाव्या शटडाऊनला पालिकेस मुहूर्त सापडत नाही. आतापर्यंत फक्त 17 कोटींचा खर्च झाला असून अद्याप 25 कोटींचा खर्च करुन शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करावयाचा आहे.