होमपेज › Solapur › टिपणी : ‘चल गं सखे माळरानात...’

टिपणी : ‘चल गं सखे माळरानात...’

Published On: Apr 23 2018 1:18AM | Last Updated: Apr 23 2018 1:18AMसंतोष आचलारे

सोलापूर जिल्ह्यात सध्या उन्हाचा पारा 42 अंशावर पोचला गेला आहे. अशापरिस्थितीतही गावागावांत पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून तरुणवर्ग माळरानावर जलसंधारणाच्या कामासाठी उत्साहाने जुंपला गेला आहे. विशेषता गावातील तरुणींची संख्याही या कामावर वाढताना दिसून येत आहे. दुष्काळात डोळ्यातून पाणी काढत बसण्यापेक्षा रानात पाणी आणण्याची धडपड दिसून येत आहे. गावातील कुटुंबातील कारभारी आपल्या कारभारणीला ‘चल गं सखे माळावर...’ असेच म्हणत असून असाच प्रकार मे महिन्यापर्यंत कायम राहिला गेला तर दुष्काळावर नक्‍कीच दोन हात करता येणार आहेत. जि.प. अध्यक्ष संजय शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड हे जलसंधारणाच्या कामासाठी प्राधान्य देत आहेत. पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून योगदान देणार्‍या तरुणांच्या पाठीवर शाबासकीचा थाप मारण्याबरोबरच त्यांना या उपक्रमासाठी मूलभूत सुविधा निर्माण करुन देण्याचा प्रयत्न प्रेरणादायी ठरला आहे. अभिनेते आमीर खान यांनी या उपक्रमासाठी विशेष योगदान दिले आहे. जैन सामाजिक संघटनेसारख्या अनेक संस्था या उपक्रमासाठी पुढे येत आहेत, ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे. या मोहिमेमुळे प्रत्येक गावात आमीर खान जन्म घेत असून खर्‍याअर्थाने जलसंधारणाबाबत जागृती होताना दिसून येत आहे. जलसंधारणाच्या कामासाठी यापूर्वी अनेक शासकीय योजना सुरु होत्या. मात्र लोकसहभागातून सुरु करण्यात आलेल्या या उपक्रमात प्रत्यक्षात लोकांचा सहभाग घेण्यात येत असल्याने गावकर्‍यांना पहिल्यांदाच गावासाठी व आपल्यासाठी काही तरी करण्याची उमेद निर्माण झाली आहे. शासकीय योजना म्हणजे केवळ पैसे खाण्याचा धंदा, असाच भ्रम आतापर्यंत सर्वसामान्य नागरिकांत होता. मात्र पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून सुरु करण्यात आलेल्या जलसंधारणाच्या कामातून पहिल्यांदाच आपल्या फायद्यासाठी काही तरी होत आहे व यात आपलेही योगदान हवेच अशी भावना गावकर्‍यांत निर्माण झाल्याने अनेक गरीब कुटुंबातील सदस्यही महिला व मुलाबाळांसह दोन-चार दिवसांची मजुरी बुडवून या उपक्रमात हिरिरीने सहभागी होताना दिसून येत आहे.

दुष्काळावर दोन हात करण्यासाठी ग्रामीण भागात सध्या प्रचंड उमेद दिसून येत आहे. याच संधीचा फायदा घेत जि.प. अध्यक्ष संजय शिंदे व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी ही शक्‍ती विकासाकरता कॅश करण्याची गरज आहे. तसा त्यांचा प्रयत्न सुरुच आहे. मात्र ज्या गावात पाणी फाऊंडेशनसारख्या संस्थांना मदत करण्यासाठी मर्यादा आहेत अशाठिकाणी गावातील गावकर्‍यांना किमान जेसीबी, डंपर व इंधन आदींसाठी जि.प. सेसफंडातून तरतूद करुन देण्याची गरज निर्माण झाली आहे. जिल्हा परिषदेत गतवर्षीचा मोठ्या प्रमाणात निधी अखर्चित आहे. हा अखर्चित निधी या उपक्रमासाठी खर्ची टाकल्यास शेतकर्‍यांना खर्‍याअर्थाने उभारी देण्याचे काम होणार आहे. त्यामुळे त्यांची यासाठी सकारात्मक भूमिका आवश्यक आहे. केवळ मेच्या एक महिन्यातच हा सारा उपक्रम करता येणार आहे. त्यामुळे तातडीने या उपक्रमासाठी गती दिली तर गावागावांत  ‘चल गं सखे माळावर...’ असेच गीत घुमेल.