Sat, Feb 16, 2019 05:36होमपेज › Solapur › भाजीपाला कवडीमोल; शेतकर्‍यांना फटका

भाजीपाला कवडीमोल; शेतकर्‍यांना फटका

Published On: Aug 17 2018 1:36AM | Last Updated: Aug 16 2018 10:44PMसोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर कृषी उत्पन्न  बाजार समितीत शेतकर्‍यांकडून भाजीपाला आवक गत काही दिवसांपासून वाढली आहे. मात्र कोणत्याच भाजीपाल्यास दर नसल्याने शेतकर्‍यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. सर्वच प्रकारचा भाजीपाला कवडीमोल दराने विकला जात असल्याने शेतकर्‍यांत नाराजी दिसून येत आहे. 

दरवर्षी श्रावण महिन्यात भाजीपाल्याचे दर किंचित वाढत असतात. यंदाच्या वर्षी मात्र दरवाढ नाहीच उलट दर घसरल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढत आहे. शेपू, मेथी, कोथिंबीर, मटकी आदी भाजीपाला दोन रुपये पेेंढीच्यावर जात नसल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना किमान उत्पादन खर्चही भरुन निघत नसल्याचे दिसून येत आहे. पालक भाजीस शंभर पेंढीस शंभर ते दोनशे रुपयांचा दर मिळत आहे. टोमॅटोसाठी दोनशे ते आठशे रुपयांचा दर मिळत आहे. दोडक्यासाठी चारशे ते  बाराशे रुपये दर मिळत आहे. बटाट्यासाठी नऊशे ते  दोन हजार आठशे रुपये दर मिळत आहे. मेथीच्या भाजीसाठी तीनशे ते सहाशे रुपयांचा दर मिळत आहे. मटकीसाठी  4  हजार  क्विंटल दर मिळत आहे. भेंडीसाठी तर केवळ 50 ते 150 रुपयांचा दर प्रति दहा किलोमागे मिळत आहे.  अंबाडीची भाजी दोनशे रुपयांना शंभर पेंढी विकली जात आहे. ढोबळी मिरचीसाठीही  शंभर रुपये दहा किलोचा दर मिळत आहे. 

आषाढ व श्रावण महिन्यात होणार्‍या विविध धार्मिक कार्यक्रमांसाठी भाजीपाल्यास मागणी असते. त्यामुळे या दोन महिन्यांत भाजीपाल्यास चांगला दरही मिळतो. यंदा मात्र उलटी परिस्थिती असून कोणत्याच भाजीपाल्यास चांगला दर नसल्याने शेतकर्‍यांची चांगलीच आर्थिक कोंडी झाल्याचे दिसून येत आहे. कांदा दरही स्थिर असून दहा रुपये किलो दराने एक नंबर कांदा विकला जात आहे. काही शेतकर्‍यांनी कांद्याला दर मिळेल या आशेपोटी कांदा रोप लावण केली आहे. त्यामुळे येत्या दोन महिन्यांत कांद्याची आणखीन आवक वाढणार आहे. मात्र यासाठी  दर  मिळणार की  नाही, याबाबत शंका उपस्थित होत आहे.