Wed, Apr 24, 2019 21:31होमपेज › Solapur › भाजीपाल्यांच्या कवडीमोल दरामुळे शेतकरी तोट्यात

भाजीपाल्यांच्या कवडीमोल दरामुळे शेतकरी तोट्यात

Published On: Dec 14 2017 1:47AM | Last Updated: Dec 13 2017 9:09PM

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत मेथी, शेपू, कोथिंबीर व टोमॅटो आदी भाजीपाला पेेंढी एक रुपयापेक्षा कमी दराने विकली जात असल्याने भाजीपाला उत्पादक शेतकर्‍यांना प्रचंड तोटा सहन करावा लागत आहे. कांद्याला मात्र बर्‍यापैकी दर मिळत असल्याने कांदा उत्पादकांची चांदी असल्याचे चित्र दिसून येत आहे. 

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या भाजीपाल्यांची प्रचंड आवक वाढली गेली आहे. शेपू, कोथिंबीर, मेथी यासारख्या भाजीपाल्यांची पेंढी आठ आण्यालाही जात नसल्याने भाजीपाला उत्पादकांत प्रचंड रोष पसरला गेला आहे. दरच नसल्याने नशिबाला दोष देत हा शेतकरी शेतातील भाजीपाला काढून फेकून देत असल्याचे दिसून येत आहे. 

कृषी उत्पन्न बाजार समितीत आणलेल्या भाजीपाल्यास दर मिळत नसल्याने काही शेतकर्‍यांनी रस्त्यावर भाजीपाला फेकला आहे.  दोन रुपयाला दोन पेंढी शेतकरी स्वत: विकत असतानाही रुपयाला चार पेंढी मागणारेही काही गिर्‍याईक येत असल्याने बाजार समितीच्या आवारात शेपू, कोंथिबीर, मेथी, टोमॅटो आदींचा लाल व हिरवा चिखल होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. बाजार समितीत रोज असलेला हा चिखल बाजार समितीची यंत्रणा ट्रॅक्टरने जनावर बाजारात नेण्याचे काम करीत आहे. 

वांगी किमान 200 व कमाल 1500 रुपये क्विंटल दराने विकली जात आहे. कोथिंबीर 50 ते 400 शेकडा दराने विकला जात आहे. काकडी 600 ते 2000 शेकडा दराने विकला जात आहे. हिरवी मिरची 100 रुपयांपासून ते 2200 रुपयांपर्यंत विकली जात आहे. मेथीची भाजी 100 रुपयांपासून ते 300 रुपये शेकडा दराने विकली जात आहे. 
कांदा 200 ते 5100 रुपये प्रति क्विंटल दराने विकला जात असल्याने केवळ कांदा उत्पादक शेतकर्‍यांना दोन पैसे मिळत असल्याचे दिसून येत आहे. बटाटा 400 ते 700 रुपये क्विंटल दराने विकला जात आहे. शेपूची भाजी 100 रुपयांपासून ते 250 रुपयांपर्यंत शेकडा विकली जात आहे. टोमॅटो 200 रुपयांपासून ते 1000 रुपयांपर्यंत दराने विकला जात आहे. 

भाजीपाल्यांमुळे दोन पैसे खर्चापाण्याला होतील या आशेने अनेक शेतकर्‍यांनी भाजीपाला उत्पादन घेतले आहे. दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, मोहोळ, अक्कलकोट या तालुक्यांतील अल्पभूधारक शेतकर्‍यांचे उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन भाजीपालाच आहे. मात्र भाजीपाला कवडीमोल झाल्याने व प्रचंड तोटा झाल्याने शेतकर्‍यांचे आर्थिक कंबरडे मोडले गेले आहे. भाजीपाला मोडून दुसरे पीक घेण्याचा कालावधीही आता निघून गेल्याने ‘तेलही गेले अन् तूपही गेले’ अशीच अवस्था या शेतकर्‍यांची झाली आहे.  येत्या काळात भाज्यांच्या दरातील घट कायम राहिल्यास शेतकर्‍यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे.