Wed, Jul 17, 2019 18:21होमपेज › Solapur › सोलापूर विद्यापीठ : अभ्यासकेंद्राच्या फीवाढीमध्ये मोठी कपात

सोलापूर विद्यापीठ : इथे असाही कारभार चालतो तर...

Published On: Jul 24 2018 11:28PM | Last Updated: Jul 24 2018 11:20PMसोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर विद्यापीठाच्या रंगभवन येथील अभ्यासकेंद्राच्या फीवाढीसंदर्भात येथील विद्यार्थ्यांनी आज, मंगळवारी कुलगुरूंची भेट घेतली. यावर कुलगुरूंनी अभ्यासकेंद्राच्या फीवाढीमध्ये मोठ्या प्रमाणात कपात केली असून विद्यार्थ्यांनी यावर समाधान व्यक्त केले आहे.

सोलापूर विद्यापीठातर्फे रंगभवन येथील चालवल्या जाणार्‍या अभ्यासकेंद्राच्या फीवाढीचे सर्क्युलर विद्यापीठातर्फे काढले होते. ज्यामध्ये इंटरनल विद्यार्थ्यांसाठी 310 वरून 620, तर एक्सटर्नल विद्यार्थ्यांसाठी 510 वरून 1120 रूपये वाढ करण्यात आली होती. ही फी वाढ 20 जुलैपासून लागू केली होती. त्यावर येथील विद्यार्थ्यांनी फीवाढीचा निषेध केला आणि या निर्णयाविरोधात तात्काळ सोमवार, 23 जुलै रोजी विद्यापीठ प्रशासनाविरोधात रंगभवन येथील अभ्यासकेंद्रासमोर आंदोलन केले. 

यावर कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी त्यांच्या दालनात मंगळवार,  24 जुलै रोजी दुपारी साडेबारा वाजता  विद्यार्थ्यांबरोबर चर्चा केली आणि विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी यापुढेही अभ्यासकेंद्र सुरू राहणार आहे. त्यामध्ये इंटरनल विद्यार्थ्यांची फी 310 रूपयांवरून 620 रूपये होणार नसून ती आहे तशीच राहिल आणि एक्सर्टनल विद्यार्थ्यांचीदेखील फी 510 रूपयांवरून 1120 रूपये न होता ती नाममात्र शंभर रूपये वाढ करून 610 रूपये वाढवण्यात येत  असल्याचे विद्यार्थ्यांना सांगितले. कुलगुरू डॉ. फडणवीस यांच्या या निर्णयाचे स्वागत येथील विद्यार्थ्यांनी केले आणि त्यांचे आभार मानले. यावेळी संतोष म्हमाणे, सागर उपासे, अनिल चौगुले, प्रसनजित गाडे, सिद्राम बोल्ली, गणेश येमूल, अशोक म्हेत्रे आदी विद्यार्थी उपस्थित होते.

इथे असाही कारभार चालतो तर...

विद्यापीठ प्रशासनातर्फे अभ्यासकेंद्राच्या फीवाढीचे सर्क्युलर काढले. याला विरोध म्हणून विद्यार्थ्यांनी त्याच दिवशी आंदोलन केले. या आंदोलनानंतर आणि विद्यार्थ्यांशी चर्चा करताना कुलगुरू डॉ. फडणवीस यांना हा प्रकार माहिती झाला. त्यामुळे कुलगुरूंना कोणतीही माहिती न देता हे सर्क्युलर काढल्याने त्यांनीही विद्यार्थ्यांसमोर इथे असाही कारभार चालतो तर..., असे म्हणत यापुढे प्रत्येक कागद तपासावा लागणार असल्याचे सांगितले. मात्र सर्क्युलर काढल्याने आंदोलन झाले. त्यामुळे सर्क्युलर काढणार्‍यावर काय कारवाई होणार, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.