Fri, Jul 19, 2019 05:08होमपेज › Solapur › प्रभारी कुलगुरूंनी लावले निवृत्त कुलगुरूंना काम

प्रभारी कुलगुरूंनी लावले निवृत्त कुलगुरूंना काम

Published On: Dec 13 2017 10:12AM | Last Updated: Dec 13 2017 10:12AM

बुकमार्क करा

सोलापूर : रणजित वाघमारे

कुलगुरू डॉ. मालदार यांचा कार्यकाळ 10 डिसेंबर 2017 रोजी संपला आहे. असे असताना ते सध्या ‘पेंडिंग फाईलीं’वर सह्या करत असून त्यांना प्रभारी कुलगुरूंनी काम लावले असल्याचे समोर आले आहे. सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार यांचा कार्यकाळ 10 डिसेंबर 2017 रोजी संपला आहे. त्यामुळे कुलगुरू निवडीची प्रक्रीया सुरू आहे. तोपर्यंत या ठिकाणी पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर यांची सोलापूर विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदी निवड केली आहे. 

परिणामी, प्रभारी कुलगुरू डॉ. करमाळकर हे 10 डिसेंबर 2017 रोजी  सोलापूर विद्यापीठात पदभार स्विकारण्यासाठी आले होते. यावेळी निवृत्त कुलगुरू डॉ. मालदार यांच्याकडून पदभार स्विकारल्यानंतर त्यांच्याशी सोलापूर विद्यापीठ, येथील कामकाज, समस्या आदी कार्याबद्दल चर्चा झाली. त्यानंतर निवृत्त कुलगुरू डॉ. मालदार यांनी ‘पेंडिंग फाईली’ प्रभारी कुलगुरू डॉ. करमाळकर यांच्या हाती सोपवल्या. परंतु, डॉ. करमाळकर यांनी ‘तुमचे अर्धवट काम तुम्हीच करा, यापुढील कामकाज करण्याची  जबाबदारी माझी आहे. त्यामुळे तुम्ही पाहिजे तर विद्यापीठात चार दिवस बसा. अपूर्ण काम पूर्ण करा.’, असे सांगितल्याची माहिती विद्यापीठातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने नाव न सांगण्याची अटीवर दै. ‘पुढारी’शी बोलताना दिली.

यामुळे निवृत्ती नंतरही डॉ. मालदार हे 11 व 12 डिसेंबर रोजी कुलगुरूंच्या केबीनमध्ये बसून अर्धवट राहिलेल्या ‘पेंडिंग फाईलीं’चा निपटारा करत असून प्रभारी कुलगुरूंनी निवृत्त कुलगुरूंना कामाला लावल्याचे दिसून येत आहे.

याबाबत निवृत्त कुलगुरू डॉ. मालदार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दूरध्वनी उचलला नाही. तर कुलसचिव डॉ. गणेश मंझा यांना ‘निवृत्तीनंतर डॉ. मालदार हे कार्यालयात येवून फाईलींवरती सह्या करत असल्याचे दिसून येत आहेत.’ याबाबत विचारले असता त्यांनी,‘ज्यांनी ही माहिती दिली. त्यालाच विचारा किंवा त्याला माझ्याकडे पाठवा. मी त्याला याबद्दल सांगतो.’ असे म्हणत उडवाउडवीचे उत्तर दिले.

...तर बहिष्कार टाकला नसता
डॉ. मालदार यांच्या निवृत्तीमुळे 9 डिसेंबर रोजी निरोप समारंभ आयोजिला होता. तर त्यांनीही विद्यापीठातील अधिकारी-कर्मचार्‍यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. मात्र विद्यापीठातील अधिकारी-कर्मचार्‍यांचे त्यांनी अनेक प्रश्‍न सोडवता येत असताना ते सोडवले नाहीत. त्यामुळे निरोप समारंभ व स्नेहभोजनावरती 80 ते 100 अधिकारी-कर्मचार्‍यांनी बहिष्कार टाकला. परंतु, कुलगुरू डॉ. मालदार यांनी निवृत्ती अगोदरच फाईली पूर्ण केल्या असत्या. निवृत्तीनंतर कामकाज करण्याची आणि निरोप समारंभावरही बहिष्कार टाकण्याची वेळ आली नसती.