Sun, Jun 16, 2019 02:57होमपेज › Solapur › उजनीतून भीमा नदीत पाणी सोडले, नदीकाठच्या गावांना दिलासा  

उजनीतून भीमा नदीत पाणी सोडले, नदीकाठच्या गावांना दिलासा  

Published On: May 29 2018 7:42PM | Last Updated: May 29 2018 7:42PMबोंडले : प्रतिनिधी

उजनी धरणाच्या गाळमोरी मधून भीमा नदीपात्रात मंगळवार दि.२९ मे रोजी सायंकाळी ५.३० वाजल्‍या पासून ६०० क्युसेस वेगाने पाणी सोडण्यास सुरवात झाली आहे. यामध्ये टप्याटप्प्याने वाढ करण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली आहे.      

उजनी धरणामधून भीमा नदीत पाणी सोडण्यासाठी भीमा नदीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकर्‍यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलेला होता. भीमा नदी पात्र गेल्या महिनाभर कोरडे पडलेले असल्यामुळे भीमा नदीकाठच्या माढा, माळशिरस, पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील शेतकर्‍यांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागले आहे.

आज दि.२९ मे २०१८ रोजी सायंकाळी ६ वा. उजनी धरणांमधील पाणीपातळी ४९०.७००  मी, एकुण साठा  १७३८.६२  द.ल.घ.मी, उपयुक्त साठा उणे  ६४.१९ द.ल.घ.मी, धरणाची टक्केवारी उणे ४.२९ % एवढी आहे तर एकूण पाणीसाठा ६१.२९ टीएमसी असून,  त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा उणे २.३७  टीएमसी एवढा आहे.

उजनी धरणामधून सोलापूरच्या पाणीपुरवठ्यासाठी दुसरे आवर्तन भीमा नदीवरील सोलापूर महानगरपालिका, पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला नगरपालिका व इतर ग्रामीण पाणी पुरवठा योजनेसाठी (आकस्मिक आरक्षणापैकी) सोलापूर मनपाच्या मागणीनुसार साधारणपणे पाच टीएमसी एवढे पाणी सोडले जाणार आहे.

दरम्यान, उजनी धरणाच्या मुख्य कालव्यामधून उजनी उजवा व डावा कालव्याच्या लाभक्षेत्रामधील सिंचनासाठी दुसरे आवर्तन सुरू असून, हे आवर्तन साधारणपणे ६ जून पर्यंत चालण्याची शक्यता जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून वर्तवण्यात आलेली आहे. उजनी उजव्या कालव्याचे आवर्तन साधारणपणे ३१ मे पर्यंत चालणार असून, १ जून पासून उजव्या कालव्यांद्वारे  माण नदीत पाणी सोडण्यात येणार आहे. हे पाणी साधारणपणे ६ जून पर्यंत राहील अशी माहिती भीमा पाटबंधारे  विभाग, पंढरपूर विभागाचे कार्यकारी अभियंता आर. के जगताप यांनी दिली.