Mon, Aug 19, 2019 09:34होमपेज › Solapur › वर्दळीतल्या चौकांमध्ये वाहतूक नियमांची पायमल्ली

वर्दळीतल्या चौकांमध्ये वाहतूक नियमांची पायमल्ली

Published On: Feb 09 2018 10:55PM | Last Updated: Feb 09 2018 9:08PMसोलापूर : इरफान शेख

 शहरामध्ये वर्दळीच्या ठिकाणी सातत्याने ट्रॅफिक जॅमचे दृश्य पाहायला मिळते. विशेषतः शिवाजी चौक आणि सात रस्ता परिसरात वाहतूक पोलिस उभे असतानादेखील मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होते. वाहतूक विस्कळीत झाली तरी चौकातील वाहतूक पोलिस कोणताही हस्तक्षेप करत नाहीत. शिवाजी चौकात तर दर पंधरा मिनिटाला वाहतुकीची कोंडी होते. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याशेजारीच ट्रॅफिक पोलिसांचा कंट्रोल बूथ आहे. या कंट्रोल बूथशेजारीच रिक्षा थांबलेल्या असतात. वाहतूक पोलिस ज्यावेळी कोंडी होते त्यावेळीच रिक्षांना तेथे थांबण्यास मज्जाव करतात. अन्यवेळी मात्र वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली होत असताना बघ्यांची भूमिका घेतात.

चौकातील वाहतूक व्यवस्थापन गरजेचे

सोलापूर शहरामधील शिवाजी चौक, रंगभवन चौक, सात रस्ता, बाळी वेस, मधला मारुती, कोंतम चौक, रामलाल चौक, भैय्या चौक, अशोक चौक, गेंट्याल चौक, महावीर चौक आदी परिसरात वाहनचालकांना वाहने हाकताना श्‍वास गुदमरतोय. लहान मुलांपासून ते वृध्दांपर्यंत व पायी जाणार्‍या पादचार्‍यांपासून ते दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना जीव मुठीत धरुन येथून ये-जा करावी लागत आहे.शहराच्या मधोमध असणार्‍या विविध चौकांत हातगाडीचालकांनी, फळ विक्रेत्यांनी, पानटपरीचालकांनी, भजी गाड्यावाल्यांनी अतिक्रमण केल्याने शहराच्या मध्य भागातील चौकांत वाहतूक कोंडी होत आहे. मनपा प्रशासन मात्र गप्प निमूटपणे हे सर्व चित्र पाहत चूप राहण्यातच भलाई समजत आहे. 

सोलापूर शहर हे तेलंगणा व कर्नाटक राज्यांना चिकटून असल्याने  त्या राज्यांतील नागरिक वेगवेगळ्या कारणांसाठी सोलापुरातल्या बाजारपेठेत बाजारासाठी येतात. परंतु शहरातील वाहतुकीच्या समस्येने परप्रांतीयांनी नकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त करत सोलापुरातून काढतापाय  घेतला आहे व घेत आहेत. शहरामधूनच जड वाहतुकीच्या वाहनांना मार्ग असल्याने बाहेरगावांहून आलेले अनेक नागरिक आश्‍चर्य व्यक्त करत जातात. कारण अनेक शहरांमध्ये फ्लायओव्हर (उड्डाणपूल) किंवा शहराबाहेर रिंगरोड अशी व्यवस्था केली आहे. त्याबाबतीत सोलापूर शहर मात्र गेल्या अनेक वर्षांपासून मागे राहिलेले आहे. याला कोण कारणीभूत आहे, हे सर्वश्रृत आहे.

शिस्तीची कल्पनाही करवत नाही

शहरामधील शिस्त ही संकल्पना नाहीशी झाली आहे. कोणीही शिस्त पाळण्यास तयार नाही. अनेक चौकांत पानटपरी, फळ विके्रते, भजी विक्रेते, ऑम्लेट गाड्या, बेशिस्त रिक्षाचालक यामुळे मोठी वाहतूक कोंडी होत असते.

प्रशासन अतिक्रमणाच्या  मुख्य समस्येकडे लक्ष देत रस्ता मोकळा करण्याऐवजी दुसर्‍याच कामात व्यस्त आहे. शहरातील लोकसंख्येचा जसा झपाट्याने विकास झाला तसा शहरातील पायाभूत सुविधांचा विकास झालेला नाही. एखाद्या मोठ्या खेड्यात राहिल्याप्रमाणे येथील नागरिक जीवन जगत आहेत. आजपर्यंत फक्त मतांचे राजकारण पाहावयास मिळाले. एकाही राजकारण्याने शहराच्या विकासासाठी  जिद्दीने व हिरीरिने कार्य केले नाही. 

अनेकांनी अपघातात गमावले प्राण

शहरामध्येच अनेक नागरिकांना अपघातांमध्ये आपले प्राण गमवावे लागले आहेत. बेशिस्त रिक्षाचालकांची तर मुजोरी एवढी वाढली आहे की, शहरामध्ये त्यांना पोलिसांचा धाक राहिलेलाच नाही.कोणत्याही चौकात कशाहीप्रकारे अडवी वाहने लावून प्रवासी घेण्याच्या गडबडीत हे रिक्षाचालक दिसतात. या रिक्षाचालकांना एखाद्या नागरिकाने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता उलट दमबाजी करुन जातात. शहरातून जाणारी जड वाहने भरधाव वेगात जातात.  अचानक कोणी व्यक्ती समोर आली तर या जड वाहनांना ब्रेकदेखील लागणे अवघड आहे.

शहरातील वाहनधारकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अतिक्रमणांचा विळखा वाढतच चालला आहे. शिवाजी चौैकातून बाळी वेस, पुणे नाका, सम्राट चौक या चौकांकडे जाणार्‍या वाहनांचा जबरदस्त लोंढा असतो.

स्थानिक मनपा प्रशासनाने, पोलिस प्रशासनाने शहरामधील अतिक्रमण हटविण्याचे मुख्य कार्य करावे व योग्य अशी सिग्नल  व्यवस्थेची सेवा सोलापूरकरांना द्यावी, अशी मागणी अनेक वाहनधारकांनी व नागरिकांनी वेळोवेळी केली आहे.