Mon, Apr 22, 2019 12:13होमपेज › Solapur › टोळके करून पोलिसांची नाकेबंदी!

टोळके करून पोलिसांची नाकेबंदी!

Published On: Feb 05 2018 11:00PM | Last Updated: Feb 05 2018 9:10PMशहरात रिक्षा, जीप, अ‍ॅपेतून अवैध प्रवासी वाहतूक   वाहतूक शाखेच्या पोलिसांसमोर बोकाळली

वाहतूक पोलिस नाक्यांवर टोळक्याने थांबून   परराज्यांतील वाहने अडविण्यात मश्गुल

आयुक्‍तालयासमोरच रिक्षातून अवैध प्रवासी वाहतूक  जड वाहतूकही राजरोसपणे सुरू

शहरातील सिग्नल बेशिस्त बनले असून सिग्नलच झालेत रिक्षा थांबे

‘स्मार्ट सिटी’च्या कामामुळे बंद केलेल्या रस्त्याच्या पर्यायी मार्गासाठी नाही वाहतूक शाखेचे नियोजन


वाहतूक शाखेकडील क्रेनकडून केवळ दुचाकींवरच  कारवाई, तर चारचाकींना सोडले मोकळे


वाहतूक सुरळीत करण्याकडे कर्मचार्‍यांबरोबरच अधिकार्‍यांचेही साफ दुर्लक्ष
 

सोलापूर : अमोल व्यवहारे

शहरात  चौकाचौकांतील  वाहतूक विस्कळीत   झाल्याचे   चित्र सध्या  दिसत  असून  आयुक्‍तालयाची   वाहतूक शाखा मात्र, टोळक्याने थांबून नाकेबंदीमध्ये जास्त  रस दाखवत असल्याचे जाणवते. शहरात अवैध प्रवासी वाहतूक, जड वाहतूक बंदी, सिग्नलवरच रिक्षा थांबे, एकेरी वाहतुकीचा  बोजवारा  उडाल्याचे दिसत असून वाहतूक शाखेच्या क्रेनकडून करण्यात येणार्‍या कारवाईत दुजाभाव  केला जात आहे. याकडे वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांचे दुर्लक्ष होत आहे. 

शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत चालावी म्हणून शहर वाहतूक शाखा कार्यरत आहे. या शाखेकडे स्वतंत्र सहायक पोलिस आयुक्‍त, दोन पोलिस निरीक्षक, 6 पोलिस उपनिरीक्षक आणि जवळपास 90 पोलिस कर्मचार्‍यांचा फौजफाटा आहे. शहरात 19 चौकांमध्ये सिग्नल व्यवस्था आहे. परंतु त्यापैकी बोटावर मोजण्याइतपत  चौकामधील सिग्नल सुरू आहेत. या चौकामधूनही वाहतूक पोलिसांचे  अस्तित्व  जाणवून येत नाही. 

अवैध  प्रवासी  वाहतूक   बोकाळली
शहरातून बाहेर जाणार्‍या प्रत्येक रस्त्यावर तसेच शहरातील अनेक मार्गांवरदेखील अवैध वाहतूक बोकाळलेली दिसून येते. रिक्षा, जीप, अ‍ॅपेरिक्षामधून  मोठ्या प्रमाणात अवैध प्रवासी वाहतूक पोलिसांच्यासमोरच केली जात आहे. पोलिस आयुक्‍तालयासमोरच्या रस्त्यावरच  रिक्षातून  मोठ्या  प्रमाणात अवैध  प्रवासी वाहतूक केली जात असून याकडे वाहतूक  पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. शहरातील सात रस्ता, भैय्या चौक, एस.टी. स्टँड, मार्केट यार्ड, जुना अक्‍कलकोट नाका, आसरा चौक, कुंभार वेस अशा अनेक ठिकाणांहून अवैध प्रवासी वाहतूक होते. 

वाहतूक कर्मचारी नाक्यावर
शहरात वाहतुकीचा बोजवारा उडाला असतानाही वाहतूक शाखेचे कर्मचारी मात्र टोळक्याने नाक्यांवर वाहने अडविण्यात व्यस्त असल्याचे दिसून येते. जुना पुना नाका येथील महामार्गावरील पुलाखाली, अक्क्‍लकोट रोड, तुळजापूर रोड या रस्त्यांवर वाहतूक पोलिस टोळक्याने उभे राहून सोलापूर व्यतिरिक्‍त इतर जिल्ह्यांतून आलेल्या वाहनांना अडविताना दिसून   येतात. देवदर्शनासाठी परजिल्ह्यांतून येणार्‍यांची संख्या जास्त आहे. परंतु वाहतूक पोलिसांच्या या प्रकारामुळे सोलापूर  पोलिसांची  प्रतिमा  मलिन होत आहे. भाविकांना नाहक त्रास दिला जात असल्याबाबत अनेकांकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्‍त केल्या जात आहेत.

जड व वाळू वाहतूक  सुरूच
शहरातून दिवसा जड वाहतुकीस बंदी असताना बंदी  काळात  जड वाहतूक  सुरू  असते. यामध्ये  प्रामुख्याने खडी आणि सिमेंट वाहतुकीच्या वाहनांचा समावेश आहे. वाळू वाहतुकीस बंदी असतानाही रात्रीच्यावेळी  अनेक वाहनांमधून चोरटी वाळू वाहतूक सुरूच आहे. नियमांचे उल्लंघन करून ही जड वाहतूक कोणाच्या आशीर्वादाने  सुरू आहे, असा प्रश्‍न उपस्थित होतो.

क्रेनच्या कारवाईत दुजाभाव
रस्त्याच्या कडेला चुकीच्या पद्धतीने पार्किंग करणार्‍या वाहनांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक शाखेकडून खासगी तत्त्वावर के्रेन चालविली जाते. या के्रेनच्या कारवाईतदेखील दुजाभाव केला जातो. केवळ दुचाकींवरच कारवाई होते. चारचाकी वाहनांवर कसलीच कारवाई होत नाही. या क्रेन केवळ काही ठराविक मार्गांवरच फिरून दुचाकींवर कारवाई होते. शहरातील गर्दीच्या मार्गांवर ही क्रेन फिरकतदेखील नाही.

सिग्नलच बनले रिक्षा थांबे
चौकाचौकांत  गर्दी  होऊ नये म्हणून  शहरातील  रिक्षा थांबे हे चौकापासून व सिग्नलपासून दूर असले पाहिजेत. परंतु शहरात याउलट चित्र दिसते. प्रत्येक चौकात रिक्षा थांबे बनले असून सिग्नलच रिक्षा थांबे बनल्याचे दिसून येते. ज्या चौकात सिग्नल सुरू आहे त्या चौकातच  रिक्षावाले सिग्नल सुटल्यानंतर अचानकपणे थांबून प्रवासी घेतात. हा प्रकार वाहतूक पोलिसांच्या समोर होत असून याकडे पोलिस जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते. सरस्वती चौक, डफरीन चौक, महावीर चौक, पत्रकार भवन चौक, आसरा चौक, मार्केट यार्ड चौक, शांती चौक अशा चौकांमध्ये सिग्नलच रिक्षा थांबे बनले आहेत. त्यामुळे या चौकांमध्ये किरकोळ अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे.

वाहतुकीचे नियोजन नाही
‘स्मार्ट सिटी’ अंतर्गत होणार्‍या कामासाठी डफरीन चौक ते रंगभवन चौक हा रस्ता अनेक महिन्यांसाठी बंद करण्यात आलेला आहे. त्यामुळे वाहनचालकांकडून जिल्हा परिषदेसमोरील रस्ता आणि रंगभवनजवळील चर्चपासून हॉटेल ध्रुवकडे येणार्‍या रस्त्याचा अवलंब करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेसमोर आणि हॉटेल धु्रवजवळ वाहनचालकांची मोठी गर्दी होत असून दिवसांतून अनेकवेळा वाहतूक खोळंबली जाते. परंतु याकडे वाहतूक शाखेने पूर्णपणे दुर्लक्ष केलेले आहे. याठिकाणी वाहतूक पोलिस नेमण्याची मागणी वाहनधारकांकडून करण्यात येत आहे.

अधिकार्‍यांचे दुर्लक्ष
तत्कालीन पोलिस आयुक्‍त डॉ. भूषणकुमार  उपाध्याय  हे  स्वतः अनेकदा वेगवेगळ्या चौकाचौकांमध्ये थांबून  वाहतूक सुरळीत सुरु आहे की नाही याबाबतचा आढावा घेत होते. सध्या  कार्यरत असलेले वाहतूक शाखेचा एकही अधिकारी चौकाचौकांमध्ये थांबून वाहतुकीचा आढावा घेताना दिसून येत नाही. सोलापुरात बदलून आलेल्या  सध्याच्या  वाहतूक  शाखेच्या सहायक पोलिस आयुक्‍तांनी वाहतुकीबाबत जनजागृती करण्याबाबत सांगितले होते. परंतु जनजागृती सोडाच वाहतूक कोंडीच्या एखाद्या घटनेवेळीही त्या घटनास्थळी दिसून येत नाहीत. डीसीपी, एसीपी, दोन पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक अशी अधिकार्‍यांची टीम असतानाही शहरातील वाहतुकीकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे आता पोलिस आयुक्‍तांनीच स्वतः वाहतूक शाखेकडे लक्ष घालून शहरातील वाहतूक सुरळीत करण्याबाबत प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे.