होमपेज › Solapur › शहरातूनच जातोय मृत्यूचा महामार्ग

शहरातूनच जातोय मृत्यूचा महामार्ग

Published On: Feb 07 2018 11:17PM | Last Updated: Feb 07 2018 9:08PMसोलापूर : इरफान शेख

शहरातील जड वाहतुकीमुळे होणार्‍या अपघातांना रोखण्यासाठी जड वाहतुकीला विशिष्ट कालावधीतच शहरात प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला. पण या निर्णयामुळेदेखील अपघातांच्या प्रमाणात कोणताच फरक पडला नाही. उलट कमी कालावधीत शहारातून पुढे जाण्याच्या घाईत अपघातांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे शहरातून जाणारा महामार्ग हा मृत्यूचा मार्ग बनला आहे. शहरात अशी भयंकर अशी स्थिती निर्माण झाली असताना वाहतूक शाखेचे पोलिस चौकात उभे राहून पावत्या फाडण्यापलीकडे काही करत नाहीत. जोपर्यंत उड्डाणपूल होत नाही तोपर्यंत हा प्रश्‍न सुटणे शक्य दिसत नाही.

सोलापूर शहरामधील शांती चौक, जुना बोरामणी नाका ते मार्केट यार्डसमोरील चौक हे मृत्यूचे महामार्ग म्हणून ओळखले जातात. गेल्या अनेक वर्षांपासून या महामार्गांवर अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. लहान मुलांपासून ते वृध्दांपर्यंत व पायी जाणार्‍या पादचार्‍यांपासून ते दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना जीव मुठीत धरुन येथून ये-जा करावी लागत आहे.  

सोलापूर  शहराला  राष्ट्रीय महामार्ग क्र. 9 सोलापूर-पुणे (सध्या राष्ट्रीय महामार्ग 65) या क्रमांकाने ओळखले जाते. या महामार्गाला महाराष्ट्र, कर्नाटक व  तेलंगणा  ही राज्ये जोडली गेली आहेत. हे महामार्ग पुणे ते मच्छलीपट्टणम या शहरांना जोडते, तर राष्ट्रीय महामार्ग 13 सध्या नॅशनल हायवे 52 महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यांदरम्यान आहे. हे दोन्ही महामार्ग शहराच्या हृदयातून जातात. 
दुपारच्या वेळी सोलापूर शहराच्या मध्य भागात जड वाहनांची भयानक अशी गर्दी असते. विजापूर नाका, पत्रकार भवन चौक, महावीर चौक, गुरुनानक चौक, गेंट्याल चौक, अशोक चौक, शांती चौक, जुना बोरामणी नाका चौक, मार्केट यार्ड चौक या चौकांमधून  जीवघेणी वाहतूक होताना दिसते. यामधील काही मुख्य चौकांत सिग्नलची व्यवस्था करण्यात आली आहे, तर काही ठिकाणी (हातवारे करत) मॅन्युअलप्रमाणे वाहतूक सुरुळीत केली जाते. परंतु जड वाहतुकीच्या या महार्गावरील चौकांत पानटपरी, भजी विक्रेते, ऑम्लेट गाड्या, बेशिस्त रिक्षाचालक यामुळे मोठी वाहतूक कोंडी होत असते.प्रशासन या मुख्य समस्येकडे लक्ष देत रस्त मोकळा करण्याऐवजी एन्ट्री वसुली, दुचाकीधारकांना पकडून पीयूसी विचारणा करणे अशा विविध प्रकारची दंड  वसुली केली जाते.
शहरातील वाहनधारकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.वाहतूक  शाखेच्यावतीने  चौकाचौकांत सिग्नलची व्यवस्थादेखील करण्यात आली आहे. परंतु, या चौकांत अतिक्रमणांचा विळखादेखील वाढतच चालला आहे. फळ विक्रेते, बेशिस्त रिक्षाचालक, पानटपर्‍या, भजींच्या गाड्या यामुळे फूटपाथ झाकले गेले आहेत. वाहतूक कोंडीचा प्रश्‍नदेखील मोठा होत चालला आहे. वाहनधारक या वाहतूक कोंडीमुळे त्रस्त झाले आहेत. रात्रीच्या वेळी शहरामधील  या महामार्गावरील हातगाड्यांवर मद्य शौकिनांचीदेखील गर्दी मोठ्या प्रमाणात वाढलेली असते.
स्थानिक मनपा प्रशासनाने, पोलिस प्रशासनाने शहरामधून जाणार्‍या महामार्गार्ंवरील अतिक्रमण हटविण्याचे मुख्य कार्य करावे, अशी मागणीदेखील अनेक वाहनधारकांनी व नागरिकांनी वेळोवेळी केली आहे.प्रशासन मात्र मूग गिळून गप्प आहे.