Wed, Mar 20, 2019 23:10होमपेज › Solapur › लिंगायतांचा आज महामोर्चा!

लिंगायतांचा आज महामोर्चा!

Published On: Jun 02 2018 10:31PM | Last Updated: Jun 02 2018 10:22PMसोलापूर : प्रतिनिधी

लिंगायत धर्माला संविधानिक मान्यता मिळावी आणि राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्याक दर्जा मिळावा, या मागणीसाठी काढण्यात येणार्‍या लिंगायत समाजाच्या महामोर्चाला हजारोंचा जनसमुदाय आणि 50 हून अधिक धर्मगुरू उपस्थित राहतील. तसेच, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रशासकीय गेटसमोर (पूनम गेट) येथे या मोर्चाचे विराट सभेमध्ये रुपांतर होणार आहे, अशी माहिती अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीचे जिल्हा समन्वयक विजयकुमार हत्तुरे यांनी दिली. दरम्यान, या मोर्चाला शिवा संघटनेसह श्रीराम युवा सेनेने विरोध दर्शविला आहे. अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. 

सकाळी दहा वाजता कोंतम चौक येथील महात्मा बसवेश्‍वर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या मोर्चाला सुरुवात होणार आहे. त्यानंतर माणिक चौकमार्गे विजापूर वेस, मार्कंडेय मंदीर, पंचकट्टा, संत बुरुड केतय्या चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रशासकीय गेटवर हा मोर्चा धडकणार आहे. 

कर्नाटक सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने त्वरित लिंगायत धर्मासंबंधी केंद्र सरकारला शिफारस पाठवावी व लिंगायतांना अल्पसंख्यांकाचा दर्जा जाहीर करावा, या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना देण्यात येणार आहे.

यानिमित्ताने शनिवारी हत्तुरे यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व लिंगायतबांधव आणि इतर जातीय बांधवांना मोर्चात सहभागी होण्याचे आवाहनही केले. यावेळी लिंगायत समितीचे अध्यक्ष चन्नबसवानंद महास्वामी,  राष्ट्रीय निमंत्रक अ‍ॅड. अविनाश भोसीकर, सकलेश बाभुळगावकर, विकास मरगुर, प्रा. शिवानंद अचलारे, माधवराव पाटील-टाकळीकर,  वीरेंद्र मंगलगे, प्रदीप बुरांडे, राजेश विभुते, आनंद कर्णे,  गणेश वैद्य, सिध्दाराम कटारे, अमित रोडगे, मयूर स्वामी, सुहास उपासे, प्रा. राहुल बोळकोटे, काशिनाथ झाडबुके, प्रा. शिवलिंग अचलारे, बसवराज पाटील, चंद्रशा बगले, धर्मराज हिरापुरे, बसवराज चकाई, प्रा. शिवानंद बडदाळे, दत्ता इरपे, धोंडप्पा तोरणगी, नागेश पडणुरे आदी उपस्थित होते.


मोर्चास येणार्‍यांच्या पार्किंगची व्यवस्था अशी

पुणे,  मंगळवेढामार्गे येणार्‍यांसाठी  होम मैदान येथे, विजापूर रोड, होटगी रोडमार्गे येणार्‍यांसाठी संगमेश्‍वर महाविद्यालायचे मैदान, हैदराबाद रोड, तुळजापूर रोडमार्गे येणार्‍यांसाठी कुचन प्रशाला आणि जयभवानी हायस्कलच्या मैदानावर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. 

मोर्चा हाणून पाडण्याचे श्रीराम युवासेनेचे आवाहन

स्वतंत्र लिंगायत धर्माच्या मागणीसाठी रविवारी काढण्यात येणारा मोर्चा हाणून पाडा, असे आवाहन श्रीराम युवासेनेच्या शहर शाखेने केले आहे. युवासेनेचे संस्थापक राजकुमार पाटील यांनी याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, स्वतंत्र लिंगायत धर्माच्या मागणीला सोलापूर शहर व जिल्ह्यातून पाठिंबा मिळालेला नाही. फक्त काहीजण नेतृत्वाच्या लालसेपोटी हा मोर्चा काढत आहेत. सोलापुरातील लिंगायत बांधव सुज्ञ असल्याने त्यांनी या मोर्चात सहभागी न होता हिंदू धर्माच्या एकतेचे दर्शन घडवावे, असे आवाहन श्रीराम युवासेनेेने केले आहे. तत्कालीन गृहमंत्री शिवराज पाटील तसेच सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे स्वतंत्र लिंगायत धर्माची मागणी करण्यात आली होती, पण ती फेटाळण्यात आली. यानंतर काही महिन्यांपूर्वी कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन या मागणीबाबत केंद्राकडे शिफारस करणारा ठराव केला. सोलापूर शहराच्या उभारणीत वीरशैव लिंगायत समाजाचे मोठे योगदान आहे. हा समाज स्वतंत्र लिंगायत धर्माला पाठिंबा देणार नाही, अशी आम्हाला खात्री आहे. काही हिंदू धर्मविरोधी लोकांनी वेळोवेळी धर्मात फूट पाडून स्वत:चा राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला. हे लक्षात घेता रविवारी निघणार्‍या तथाकथित मोर्चाला न जाता हा मोर्चा हाणून पाडावा, असे आवाहन श्रीराम युवासेनेतर्फे राजकुमार पाटील, किशोर रायचूरकर, सुभाष कलशेट्टी, लक्ष्मण ईडागोटे, सुधाकर नराल आदींनी  केले आहे.