सोलापूर : प्रतिनिधी
आजारास कंटाळून वृद्धाने पत्नीच्या डोक्यात फरशीने मारून तिचा खून करून स्वतःदेखील घरात गळफास घेऊन आत्महत्या केली, तर अन्य एका घटनेत डाक बंगल्यातील खोलीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागातून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचार्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या दोन्ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आल्या. सुदर्शन योगय्या पोटाबत्ती (वय 72) आणि अंबुबाई सुदर्शन पोटाबत्ती (62, रा. ‘ब’ विभाग, गोदुताई परुळेकर विडी घरकूल, कुंभारी, ता. दक्षिण सोलापूर) तसेच भानुदास सोपान शिंदे (62, रा. म्हाडा कॉलनी, जुळे सोलापूर) अशी मृतांची नावे आहेत.
सुदर्शन पोटाबत्ती व त्यांची पत्नी अंबुबाई हे दोघेही आजाराने त्रस्त होते. त्यांची मुले त्यांच्याजवळ राहत नसल्याने आजारी पत्नीची सुश्रुषा सुदर्शन पोटाबत्तीच करीत होते, व तेदेखील आजारी होते. या आजारपणाला कंटाळूनच सुदर्शन पोटाबत्ती यांनी पत्नी अंबूबाई या झोपलेल्या असताना त्यांच्या डोक्यात फरशी घालून त्यांचा खून केला .व नंतर स्वतःदेखील घरातील लोखंडी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर वळसंग पोलिस ठाण्यातील सहायक फौजदार भावीकट्टी यांनी सुदर्शन व अंबूबाई यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता दोघांनाही डॉक्टरांनी मृत घोषित केले. याबाबत सिव्हिल पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.
तर दुसर्या घटनेत शहरातील सात रस्ता येथील डाक बंगला येथील जास्वंदमधील रुम नं. 14 मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागातील सेवानिवृत्त चौकीदार भानुदास शिंदे यांनी गळफास घेतला. ही घटना उघडकीस आल्यानंतर सदर बझार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन शिंदे यांना खाली उतरवून उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
यावेळी मृत शिंदे यांच्याकडे चिठ्ठी मिळालेली असून यामध्ये मार्डी येथील यमाई आश्रमशाळेत असताना त्यांच्या पत्नीला अशोक लांबतुरे, त्यांची पत्नी सुरेखा लांबतुरे, मधू गवळी व नागा बनसोडे यांनी खूप त्रास दिला व पैसेही दिले नाहीत. त्यामुळे आपल्याला व पत्नीला खूप त्रास झाला असून या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करीत असल्याचे नमूद केले आहे. त्यानुसार सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरु होते.