Wed, Apr 24, 2019 11:41होमपेज › Solapur › आंतरराष्ट्रीय वस्त्र प्रदर्शनाला हजारो ग्राहकांची भेट

आंतरराष्ट्रीय वस्त्र प्रदर्शनाला हजारो ग्राहकांची भेट

Published On: Jan 28 2018 10:16PM | Last Updated: Jan 28 2018 9:58PMसोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर रेडीमेड कापड व्यापारी संघातर्फे आयोजित दुसर्‍या आंतरराष्ट्रीय  गणवेश व वस्त्र प्रदर्शनाला रविवारी दुपारपर्यंत सुमारे चार हजारांहून अधिक खरेदीदार तसेच नागरिकांनी भेट दिली. सोमवारी प्रदर्शनाचा शेवटचा दिवस आहे.

शनिवारी हॉटेल बालाजी सरोवर येथे थाटात या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले होते. सोलापूर शहर परिसर तसेच विविध राज्यांतील हजारो खरेदीदारांनी दोन दिवसांत प्रदर्शनाला भेट दिली. यामध्ये आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू, गोवा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यांचा समावेश आहे. याशिवाय इस्रायल, घाना, नायजेरिया, केनिया आदी पाच देशांच्या खरेदीदारांनी प्रदर्शनाला हजेरी लावली. 

विमानसेवेचा अभाव असल्याची व्यक्‍त केली खंत

विदेशी खरेदीदारांनी सोलापूर हे गारमेंट हब होण्यास हरकत नाही, असे मत नोंदवितानाच सोलापूरला विमानसेवा नसल्याने आमचा प्रचंड वेळ वाया जातो, अशी खंत व्यक्त केली. सोलापुरात येण्यासाठी आम्हाला विमानाने पुण्यात उतरावे लागले.  त्यानंतर सोलापुरात येण्यास 8 ते 10 तासांचा अवधी गेला. हे लक्षात घेता सोलापूरला विमानसेवा असणे गरजेचे आहे, अशी मागणी या विदेशी पाहुण्यांनी केली. 

रेमंडस् टीमचीही भेट

या प्रदर्शनाला रेमंडस् कंपनीच्या गारमेंट विभागाच्या टीमने भेट दिली.  त्यांनी युनिफॉर्म गारमेंट्स निर्मितीबाबत समाधान व्यक्त केले. छोट्या छोट्या व्यावसायिकांना घेऊन गारमेंट उद्योग सुरु करता येतो का, याबाबत आमच्या विभागाच्या अध्यक्षांबरोबर बैठक आयोजित करणार असल्याचे सोलापूर रेडीमेड कापड उद्योग संघाचे सहसचिव अमित जैन यांनी सांगितले.

या प्रदर्शनाला आतापर्यंत चार हजार ग्राहकांनी भेट दिली आहे. आणखीन दहा हजार व्यावसायिक भेट देतील, असा अंदाज आहे. केनियाचे डेविड कुमसुन आणि मैरी, घानाचे ब्लेसिंग अदिति, इस्राईलचे केम क्याट्स, सेनेगलचे अलियो गाडिगा यांचा समावेश आहे. आणखी दहा देशाचे नागरिक येणार आहेत. सोमवारी प्रदर्शनाचा शेवटचा दिवस असून याचा लाभ घ्यावा, असे जैन यांनी सांगितले.