Thu, Jun 27, 2019 13:47होमपेज › Solapur › अडीच हजार लाभार्थींसाठी हजार अर्ज 

अडीच हजार लाभार्थींसाठी हजार अर्ज 

Published On: Feb 27 2018 8:20AM | Last Updated: Feb 26 2018 9:57PMसोलापूर : प्रतिनिधी

जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणार्‍या वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी 2 हजार 455 लाभार्थी निवडी क्षमता असतानाही केवळ 1 हजार 35 अर्ज प्राप्त झाले आहेत. ज्या लाभार्थ्यांनी अर्ज केले आहेत त्यांना अनुदान देण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती जि.प. समाजकल्याण समितीच्या सभापती शीला शिवशरण यांनी दिली. 

सभापती शिवशरण यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी जिल्हा परिषदेत समाजकल्याण समितीची सभा घेण्यात आली. यावेळी वैयक्तिक लाभाच्या योजनांचा आढावा घेण्यात आला. डीबीटी योजनेमुळे लाभार्थ्यांना मंजूर झालेली वस्तू स्वत: खरेदी करणे आवश्यक आहे. त्यानंतर खरेदीची खात्री झाल्यानंतर अनुदान देण्याचा नियम आहे. हा नियम लाभार्थ्यांसाठी अडचणीसाठी ठरत असल्याने लाभार्थ्यांनी योजनेकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. यावेळी दलित वस्ती सुधार योजनेतील प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. 

जि.प. सेसफंडातून चालू वर्षाकरीता समाजकल्याण विभागाला 3 कोटी 50 लाखांचा निधी मंजूर आहे. हा निधी खर्च करण्याचा  प्रयत्न आहे. येत्या आठ दिवसांत लाभार्थ्यांनी प्रस्ताव न दिल्यास आलेल्या सर्व प्रस्तावांना मंजुरी देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. 

आगामी वर्षात सेसफंडातून समाजकल्याण विभागासाठी 7 कोटी रुपयांचा निधी देण्याची मागणी जि.प. अध्यक्षांकडे करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. या निधीतून मागासर्गीय विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करणे, दलित वस्तीत वाचनालय उभे करणे, आरओ प्लँट कार्यान्वित करणे, शेळीगट वाटप करणे, मागासर्गीय विद्यार्थ्यांना स्कॉलरशीप, मिरची कांडप, लॅपटॉप, संसारपयोगी भांडी वाटप करणे आदी योजना घेण्याचा मानस यावेळी व्यक्त करण्यात आला. दलित वस्ती सुधार योजनेतून घेण्यात येणार्‍या कामांचे उद्घाटन जि.प. सदस्यांच्या हस्ते प्रत्येक गटात करण्याचेही सूचना यावेळी देण्यात आले. या समितीच्या बैठकीस समितीचे सदस्य शिवाजी सोनवणे, सुनंदा फुले, संगीता धांडोरे, अतुल खरात, शोभा वाघमोडे, साक्षी सोरटे, अण्णाराव बाराचारी, प्रभावती पाटील, कविता वाघमारे, रेखा गायकवाड आदी उपस्थित होते.