Thu, Apr 25, 2019 11:31होमपेज › Solapur › यावर्षी जिल्ह्याला ११,२६५ घरकुले

यावर्षी जिल्ह्याला ११,२६५ घरकुले

Published On: Dec 21 2017 1:50AM | Last Updated: Dec 20 2017 9:55PM

बुकमार्क करा

सोलापूर रू महेश पांढरे

केंद्र आणि राज्य शासनाने 2019 पर्यंत सर्वांना हक्काचे घर मिळावे यासाठी विविध घरकुल योजनांना मुबलक निधी दिला असून सोलापूर जिल्ह्यालाही यावर्षी अनेक योजनांमधून जवळपास 11 हजार घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक बेघर लोकांना हक्काचे घर मिळणार आहे.

केंद्र आणि राज्य शासनाने यंदा घरकुल बांधणीवर चांगलेच लक्ष केंद्रीत केले आहे. यामध्ये पारदर्शकता यावी आणि योग्य लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळावा यासाठी संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन राबविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. सोलापूर जिल्ह्यातील बेघर आणि घरापासून वंचित असलेल्या लोकांना हक्काचा निवारा मिळावा यासाठी पंतप्रधान आवास योजना सुरू केली आहे. यामधून सोलापूर जिल्ह्याला यंदा 5 हजार 278 घरकुलांचे उद्दिष्ट मिळाले आहे. 

अनुसूचित जाती-जमातीच्या लोकांना घर मिळावे यासाठी रमाई आवास योजना सुरू करण्यात आली आहे. यामधून सोलापूर जिल्ह्यासाठी 5 हजार 870 घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. अनुसूचित जमाती अर्थात पारधी समाजातील लोकांच्या घरकुलांसाठी शबरी आवास योजना आणि पारधी विकास घरकुल योजनेतून 72 घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यामुळे यंदाचे वर्ष हे घरकुल योजनेचे वर्ष ठरणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील जवळपास 11 हजार 265 लोकांना हक्काचा निवारा मिळणार असल्याने यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेनेही चोख नियोजन केले आहे.
या घरकुलांमुळे सामान्य गरीब व्यक्तींचे घराचे स्वप्न साकार होण्यासाठी मदत होणार आहे.