होमपेज › Solapur › प्रवाशांना लिफ्ट देऊन लुटणारी टोळी जेरबंद

प्रवाशांना लिफ्ट देऊन लुटणारी टोळी जेरबंद

Published On: Dec 25 2017 1:17AM | Last Updated: Dec 24 2017 10:27PM

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

प्रवाशांना बोलेरो गाडीत लिफ्ट देऊन मारहाण करून लुटमार करणार्‍या टोळीला जेरबंद करण्यात ग्रामीण पोलिसांना अखेर यश आले आहे. ईश्‍वर चंदू दुबळे (वय 30) व लहू संतराम इटकर (23, दोघे रा. सोनारी, ता. परांडा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

16 डिसेंबर रोजी मालन शिवाजी सोनटक्के (वय 35, रा. फळवणी, ता. माळशिरस) ही महिला पारुबाई सोनटक्के व एका वयस्कर व्यक्तीबरोबर  महूदमार्गे अंकोली (मोहोळ) येथून जाण्यासाठी 
महामार्गावर थांबली होती. पांढर्‍या रंगाच्या बोलेरो जीपने त्यांना लिफ्ट देत सुखरुप सोडतो अशी बतावणी करत वाहनात बसवून घेतले होते. सांगोला रोडवरील कोळेगाव (ता. माळशिरस) येथे आल्यावर बोलेरो जीपमधील इसमांनी प्रवाशांना मारहाण करत त्यांच्याजवळील रोख रक्कम, सोन्याचे गंठण, बोरमाळ, मंगळसूत्र, कानातील झुबे असा 62 हजार रुपयांचा ऐवज लुटला होता. याबद्दल वेळापूर पोलिस ठाण्यात गुन्हादेखील झाला होता.

ग्रामीण पोलिस पथकाच्या एलसीबी विभागाने या गुन्ह्याचा तपास करत आपली सूत्रे हलविली. स्थानिक गुन्हेशाखेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना ईश्‍वर दुबळे व लहू इटकर हे दोन आरोपी सोनारीहून बार्शीमार्गे जाणार असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हेशाखेने बार्शी येथील बायपास रोडवर सापळा लावला होता.

संशयित आरोपी गुन्ह्यात वापरलेली बोलेरो जीप घेऊन या परिसरात आले असता पोलिसांनी सिनेस्टाईलप्रमाणे त्यांचा पाठलाग करुन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींकडून सॅमसंग कंपनीचा मोबाईल, बोलेरो जीप असा मुद्देमाल जप्त केला असून आणखी एका आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. ईश्‍वर दुबळे या संशयिताने कोल्हापूर व भिगवण येथेही असे लुटमारीचे गुन्हे केले असल्याचे कबूल केले आहे.ही कामगिरी पोलिस निरीक्षक विजय कुंभार, सहायक पोलिस निरीक्षक उमेश  धुमाळ, सहायक पोलिस निरीक्षक नारायण शिंदे आदींनी केली.