सोलापूर : प्रतिनिधी
शहरातील दक्षिण कसबा परिसरातील राजवाडासंकूल या अपार्टमेंटमधील केबलचे काम करायचे आहे असे सांगून चोरट्यांनी फ्लॅटमधून 6 लाख 10 हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने व रोकड चोरून नेली. ही घरफोडीची घटना मंगळवारी दिवसाढवळ्या दुपारच्या सुमारास घडली.
याबाबत गहिनीनाथ भीमराव पाटेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गहिनीनाथ पाटेकर यांच्या मुलाच्या मेहुणीच्या घरी कर्णिकनगर येथे सुवासिनीचा कार्यक्रम होता. त्यामुळे पाटेकर यांच्या घरातील सर्वजण दुपारी 1 च्या सुमारास घराच्या मेन दरवाजास व लोखंडी दरवाजास कुलूप लावून कार्यक्रमाकरिता गेले होते. कार्यक्रमाला जाण्यापूर्वी त्यांच्या घरासमोर दोन अज्ञात व्यक्ती आल्या होत्या. त्या दोन व्यक्तींनी पाटेकर यांची सून आरती यांना केबलचे काम करण्यासाठी टेरेसची चावी मागितली. त्यावेळी आरती यांनी त्या दोन व्यक्तीना आम्ही कार्यक्रमासाठी बाहेर जात आहोत समोरच्याकडून चावी घ्या, असे सांगितले व त्या निघून गेल्या.
त्यानंतर दुपारी चारच्या सुमारास कार्यक्रम संपवून पाटेकर कुटुंबीय परत आले. त्यावेळी त्यांना घराचा लोखंडी दरवाजा व आतील लाकडी दरवाजास कुलूप नसल्याचे दिसून आले.
त्यामुळे पाटेकर यांनी घरात जाऊन पाहणी केली असता मुलाच्या बेडरूममधील दोन्ही लोखंडी कपाटे व आतील लॉकर तोडलेले दिसून आले.
त्यातील लाखोंचा सोन्या-चांदीचा ऐवज नव्हता. चोरट्यांनी पाटेकर यांच्या घरातून 5 तोळ्याचे कंगण, 4 तोळ्याचे कंगण, 3 तोळ्याचे नेकलेस, साडेतीन तोळ्याचे नेकलेस, अर्धा तोळ्याचा लिंबोळी हार, तीन नग नथ, लहान मुलांच्या 15 अंगठ्या, दोन मोठ्या अंगठ्या, एक पिळाची अंगठी, 3 तोळ्याचे कानातील झुबे, फुले व वेल, चांदीचे तोडे, पैंजण, वाळे व रोख 5 हजार रुपये असा 6 लाख 9 हजार 400 रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला. याबाबत फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक संजय जगताप तपास करीत आहेत.