Thu, Jul 18, 2019 00:05होमपेज › Solapur › सोशल मीडियावर राज्यातील तेलुगुजनांना जोडण्याचे काम

सोशल मीडियावर राज्यातील तेलुगुजनांना जोडण्याचे काम

Published On: May 03 2018 10:50PM | Last Updated: May 03 2018 9:31PMसोलापूर :  वेणुगोपाळ गाडी

महाराष्ट्रात लाखोंच्या संख्येने असलेल्या तेलुगु भाषकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र पर्यायाने संघटित करण्याचे काम करण्यात येत आहे. महाराष्ट्र सकल तेलुगु भाषिक संघटनेच्या माध्यमातून हे काम केले जात असून सामाजिक प्रश्‍नांच्या सोडवणुकीसह अनेक उपक्रम राबविण्याचा संघटनेचा निर्धार आहे. 

सोलापूरच्या हार्मोनिअम-सिंथेसायझरवादक तथा गायक श्यामसुंदर येदूर यांनी गतवर्षी या संघटनेची फेसबुकवर मुहूर्तमेढ रोवली. महाराष्ट्रात सोलापूरसह पुणेे, नांदेड, मुंबई, नागपूर, नाशिक, जालना, गडचिरोली, हिंगोली, अहमदनगर आदी जिल्ह्यांमध्ये तेलुगु समाज मोठ्या प्रमाणावर आहे. तेलुगु भाषिक जवळपास 60 हून अधिक जाती आहेत. सुरुवातीला केवळ सोलापुरातील तेलुगुजनांना फेसबुकवर संघटित करण्याचा येदूर यांचा उद्देश होता. मात्र राज्यातील विविध जिल्ह्यांतील तेलुगुजणांनी या संघटनेची व्याप्ती महाराष्ट्रभर करण्याची मागणी केल्याने या संघटनेचे नाव ‘महाराष्ट्र सकल तेलुगु भाषिक संघटना’ असे ठेवण्यात आले. 

पाच लाख सदस्य करण्याचा निर्धार

या संघटनेच्या माध्यमातून तेलुगुजनांना संघटित करण्याबरोबरच सामाजिक प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. फेसबुकशिवाय व्हॉटस्अ‍ॅपवर तेलुगुजनांचे पेठनिहाय ग्रुप बनविण्याचे कामदेखील सुरु आहे. गेल्या वर्षभरात सुमारे 30 हजार  जणांना सदस्यत्व करुन घेण्यात आले आहे. ही संख्या पाच लाखांवर नेण्याचा संघटनेचा निर्धार आहे. 

संघटनेतर्फे विविध उपक्रम राबविण्याचा मानस आहे. येत्या आठवड्याभरात कैवल्यधाम नामक संगीत विद्यालय सुरु करण्यात येणार आहे. यामध्ये गायनाबरोबरच भारतीय संगीत वाद्यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. 

रविवार पेठेतील कुचन हायस्कूलनजीकच्या शिवशरणम्मा कैवल्यधाम मठात हे संगीत विद्यालय राहणार आहे. तेलुगुजनांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी तेलुगु भवनदेखील उभारण्याचा संघटनेचा प्रयत्न राहणार आहे. या भवनात सांस्कृतिक-शैक्षणिक कार्यक्रमांना व्यासपीठ तसेच शिवण आदी कामांचे प्रशिक्षण देण्याची सोय करण्यात येणार आहे, असे येदूर यांनी सांगितले. 

येदूर यांच्यासमवेत या संघटनेत व्यंकटेश पडाल, रवी गोने, संतोष  चन्ना, प्रशांत कुडक्याल, विजय मद्दा, राहुल म्हंता, सिद्धार्थ मंजेली, अंबादास गोरंटला, विनायक भैरी, अनिल दंडगुले, श्रीनिवास चिलवेरी, चंद्रहंस बोलाबत्तीन, विक्रम भीमरथी आदी कार्यरत आहे.