Sat, Jul 20, 2019 08:34होमपेज › Solapur › सोलापूर तापू लागले

सोलापूर तापू लागले

Published On: Mar 25 2018 10:34PM | Last Updated: Mar 25 2018 10:33PMसोलापूर : प्रतिनिधी 

सूर्यनारायण आग ओकू लागल्याने शहराच्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. शनिवारी अचानक वाढ झाली होती. शनिवारनंतर रविवारी तापमानाचा पारा 40.2 अंशावर पोहोचल्याने शहरवासीयांच्या उन्हाळ्याच्या तीव्र झळा बसत आहेत. मार्चअखेरच शहराचे तापमान 40 अंश सेल्सियसच्यावर गेल्यामुळे आगामी एप्रिल, मे आणि जून महिन्यांत हा पारा रौद्ररूप धारण करण्याची शक्यता असून, यावर्षी तापमानवाढीचा उच्चांक नोंदला जाण्याची शक्यता हवामान विभागाच्या अधिकार्‍यांनी वर्तवली आहे. 

पहाटेच्या वेळी थंडी तर दिवसा कडक ऊन असे वातावरण सध्या सोलापूरकर अनुभवत आहेत. काही दिवसांपूर्वी अन्यत्र पडलेल्या अवकाळी पावसामुळे शहरात ढगाळ स्वरूपाचे वातावरणही पहावयास मिळाले होते. या पार्श्‍वभूमीवर शहराचे तापमान गेल्या काही दिवसांपासून वाढत चालल्याचे दिसत आहे. 

शनिवारी तापमानाचा पारा 40 अंशांवर पोहोचला होता. कडक उन्हाची दाहकतेमुळे शहरवासीयांच्या अंगाची अक्षरश: लाहीलाही झाली. वाढते तापमान जाणवत असल्यामुळे दुपारच्या वेळी शहरात सर्वत्र शुकशुकाट जाणवत आहे. शनिवारनंतर रविवारी सुट्टीच्या दिवशी काहीसा दिलासा मिळेल अशी आशा सोलापूरकरांना होती, परंतु, रविवारीही तापमानात मोठी वाढ झाल्याचे दिसून आले. कमाल तापमान 40.2 अंश सेल्सियस नोंदले गेले तर किमान तापमान 22.6 अंश सेल्सियस नोंदले गेले. त्यामुळे शनिवारप्रमाणे रविवारीही दिवसभर शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आला. 

 उन्हापासून बचाव करण्यासाठी गॉगल, टोपी, स्कार्फना मागणी वाढत आहे. उन्हाचा त्रास कमी करण्यासाठी लिंबू सरबत, ज्यूस, लस्सी, मठ्ठा आदी ठंडाई तसेच कलिंगड, खरबूज आदी फळफळांचा आस्वाद घेतला जात आहे. मार्चमध्ये तापमान 40 अंशांवर पोहोचल्याने त्रस्त झालेल्या शहरवासीयांनी उन्हाळ्याचे आगामी एप्रिल व मे हे दोन महिने कसे जातील, याची चिंता सतावत आहे. परीक्षेचा कालावधी असल्याने वाढत्या उन्हाच्या झळा विद्यार्थ्यांना बसत आहेत.

दरम्यान, सध्या मार्चअखेर असतानाच शहराचा कमाल तापमान पारा 40 अंश सेल्सियसच्यावर वर पोहचल्यामुळे येणार्‍या एप्रिल, मे आणि जूनअखेर हा पारा आणखी किती वाढणार याची धाकाधाक आमसोलापूकरांना लागली असून, यावर्षी आजपर्यंतचे सर्व उच्चांक मोडले जाण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात येत आहे.