Mon, Apr 22, 2019 11:40होमपेज › Solapur › ...तर मंत्रीपदेही काढून घ्या

...तर मंत्रीपदेही काढून घ्या

Published On: Feb 13 2018 10:30PM | Last Updated: Feb 13 2018 9:05PM सोलापूर : वेणुगोपाळ गाडी

शहर भाजपमधील पालकमंत्री व सहकारमंत्री या दोन गटांमधील वाद थांबता थांबत नसल्याने आता मनपा बरखास्तीच्या मागणीने जोर धरला आहे. मुख्यमंत्र्यांचेही न ऐकणार्‍या या नेत्यांची मंत्रीपदे काढून पक्षातील बेशिस्तीला लगाम घालण्यात यावा, अशी भावनाही निष्ठावंत कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.

वर्षभरापूर्वी मनपात भाजपची सत्ता आली. यामुळे ‘गल्ली ते दिल्ली’पर्यंत याच पक्षाची सत्ता असल्याचा सोलापूरला मोठा फायदा पर्यायाने सोलापूरचा गतीने भरीव विकास होईल, अशी आशा जनतेमध्ये निर्माण झाली. मात्र पालकमंत्री विजयकुमार देशमुख व सहकारमंत्री सुभाष देशमुख या दोन गटांच्या वादामुळे या आशेवर चक्क पाणी फेरले आहे. गेले वर्षभर शहराचा विकास सोडाच केवळ दोन गटांच्या वादाचा ‘तमाशा’ पाहण्याची दुर्दैवी वेळ जनता तसेच भाजपच्या कार्यकर्त्यांवर आली आहे. 

या दोन गटांनी महापालिका सभेचा चक्क  ‘भातुकली’चा खेळ केला आहे. शिस्तबद्ध पक्ष समजल्या जाणार्‍या भाजपची या गटांनी अक्षरश: वाट लावल्याने जनमानसांत या पक्षाची प्रतिमा मलीन झाली आहे. या गटांची मनमानी, स्वैर वागणूक पाहता  सत्ता तसेच पदाचा माज आल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे. गत महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या निवासस्थानी दोन्ही गटांना पाचारण करून समेट घडविण्याचा प्रयत्न केला. आता नीट न वागल्यास मनपा बरखास्त करू, अशी तंबीही त्यांनी दिली होती. यानंतर या दोन गटांनी ‘मनोमिलन’ केल्यावर आता तरी वादाला पूर्णविराम मिळेल, असे मानले जात होते. पण सभागृहनेतेपदावरुन पुन्हा एकमेकांवर कुरघोडी करुन या गटांनी नालायकपणाचा कळसच गाठला आहे. सोमवारी मनपा सभेत या गटांनी सभागृहनेतेपदाचा अवमान केला.  या दोन गटांकडून सुरु असलेल्या गटबाजीचा पक्षातील निष्ठावंतांनाच नव्हे तर विरोधी पक्षांनाही किळस आला आहे. तीन-चार महिन्यांपूर्वी अतुल्य सेवा प्रतिष्ठानने सर्वप्रथम मनपा बरखास्तीची मागणी केली होती. यापाठोपाठ आता विरोधी पक्ष काँग्रेसने ही मागणी उचलली आहे. यामुळे भाजपची प्रतिमा आणखीनच डागाळली आहे. या पार्श्‍वभूमीवर आता मुख्यमंत्र्यांनी मनपा बरखास्त तर करावीच शिवाय दोन्ही देशमुखांची मंत्रीपदे काढून घ्यावीत, अशी मागणी सर्वत्र होत आहे. 

एकंदर कलंकित झालेल्या स्थानिक भाजपला सावरण्यासाठी तसेच आगामी निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी आता कठोर पावले उचलल्याशिवाय पर्याय नाही, अशी सद्यस्थिती आहे. आता  प्रदेश भाजप व मुख्यमंत्री याबाबत काय निर्णय घेतात याची उत्सुकता आहे.