Wed, Nov 21, 2018 16:06होमपेज › Solapur › साखरेचे दर पाडण्यासाठी टोळी सक्रिय

साखरेचे दर पाडण्यासाठी टोळी सक्रिय

Published On: Feb 16 2018 10:39PM | Last Updated: Feb 16 2018 9:06PMसोलापूर : प्रतिनिधी 

आंतरराष्ट्रीय आणि राज्य स्तरावर साखर कमी दरात खरेदी करून चढ्या दराने विक्री करण्याची एक साखळी सक्रिय झाली आहे. यामध्ये काही कारखानदारही सामील असून त्यांना शोधून काढण्याची मी मोहीमच हाती घेतली आहे. ही मंडळी जाणीवपूर्वक साखरेचे दर पाडत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांनी केला आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सोलापुरातील अबदुलपूरकर मंगल कार्यालयात शुक्रवारी शेतकरी आक्रोश मेळाव्यात ते बोलत होते.

यावेळी आजारी साखर कारखान्यांना अशा अडचणीच्या काळात साखर विकायला लावायची आणि दुसरीकडे आयातीला परवानगी द्यायची यामध्ये सरकारने हस्तक्षेप करणे अपेक्षित असताना त्याकडे सरकार लक्ष देत नसल्याचे खा. शेट्टी यावेळी म्हणाले. सोलापुरात एफआरपी अधिक 400 रुपयांचा  फॉर्म्युला सहकारमंत्र्यांनी मान्य केला होता. मात्र त्यानंतर बोललेला शब्द त्यांनी पाळला नाही. त्यामुळे यापुढे आंदोलनाची दिशा तीव्र करण्यात येणार असल्याचे सांगितले तसेच शेतकर्‍यांच्या उसाची बिले तात्काळ खात्यावर जमा करावीत यासाठी साखर संघावर लवकर 50 हजार शेतकर्‍यांचा मोर्चा घेऊन जाणार असल्याचे शेट्टी यांनी यावेळी जाहीर केले. शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी आहे.राज्यातील लाखो शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे पाप या सरकारने केले असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला. कर्जमाफीची आकडेवारी बोगस असून मुख्यमंत्री आणि सहकारमंत्री सांगत असलेल्या आकडेवारीत मोठी तफावत असल्याचे शेट्टी यांनी यावेळी सांगितले. यावेळी रविंद्र तुपकर,  सिद्राप्पा अबदुलपूरकर, महामूद पटेल, बबलू गायकवाड, जाफरताज पाटील, प्रा. जालिंदर पाटील, समाधान फाटे, अमोल हिप्परगी, नवनाथ माने, अनिल पवार आदी उपस्थित होते.