Tue, Jul 23, 2019 11:37होमपेज › Solapur › प्रत्येकाने सुरक्षा यंत्रणांचे कान-डोळे व्हावे

प्रत्येकाने सुरक्षा यंत्रणांचे कान-डोळे व्हावे

Published On: Feb 13 2018 1:58AM | Last Updated: Feb 12 2018 9:44PMसोलापूर : प्रतिनिधी

दहशतवादविरोधातील लढा आणखी काही दशके तरी आपल्याला द्यावा लागणार आहे. या लढ्यात दहशतवादविरोधी पथक आणि पोलिसांसह सामान्य नागरिकांचे योगदान आवश्यक आहे. नागरिकांनी सुरक्षा यंत्रणांचे कान-डोळे व्हावे.जे काही तुम्ही ऐकताय, पाहताय ते सुरक्षा यंत्रणांना सांगावे.सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही गोष्ट लपवून ठेवू नये. नागरिकांनी आपली जबाबदारी म्हणून सुरक्षा यंत्रणांना सहकार्य करावे, असे आवाहन  राज्याचे दहशतवादविरोधी पथकाचे अतिरिक्त महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

अतिरिक्त महासंचालक कुलकर्णी हे सोमवारी सोलापूरच्या दौर्‍यावर आले होते. त्यावेळी त्यांनी पोलिस आयुक्त कार्यालयात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी पोलिस आयुक्त महादेव तांबडे यांनी अतिरिक्त महासंचालक कुलकर्णी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी कुलकर्णी यांनी पोलिस अधिकारी व दहशतवादविरोधी पथकातील अधिकार्‍यांची आढावा बैठक घेतली.दहशतवादाचा    सामना    करण्यासाठी सायबर सेलसाठी 850 कोटी रुपयांच्या  निधींची तरतूद  करण्यात आली आहे. या सेलच्या माध्यमातून ऑनलाईन सोशल मीडियावर नियत्रंण ठेवण्यात येत आहे. अल्पसंख्याक विकास विभागाच्या योजनांमधून अल्पसंख्याकांचे सबलीकरण करण्याचे काम 8 विभागांमार्फत चालू आहे. 2008 पासून केंद्र शासनाचा ‘आर सिटी’ नावाचा प्रकल्प कार्यान्वित असून या प्रकल्पांतर्गत देशातील 550 जिल्ह्यांमध्ये तरुणांना मानधनावर प्रशिक्षण देण्यात येत असून यातून मार्ग बदलू पाहणार्‍या तरुणांना प्रशिक्षण दिले जात आहे. गुन्हा दाखल न करता युवकांचे मनपरिवर्तन करता यावे यासाठीचा प्रयत्न या योजनेतून करण्यात येत आहे. 

सोलापूर जिल्हा हा तीन राज्यांच्या सीमावर्ती भागात वसला असल्याने तसेच या भागात यापूर्वी दहशतवादी संघटनांशी  संबंधित लोकांना  पकडण्यात आल्याने हा जिल्हा संवेदनशील आहे. त्यामुळे तर राज्य शासनाने सोलापूर आणि नवी मुंबई येथे  नव्याने दहशतवादविरोधी पथकाचे कार्यालय सुरू केले असून सोलापूरच्या कार्यालयाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठीच हा आपला दौरा असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. यावेळी  पोलिस  उपायुक्त   नामदेव चव्हाण, अपर्णा  गिते, पौर्णिमा  चौगुले-श्रींगी, पोलिस  निरीक्षक  विजय पाटील, यशवंत केडगे  आदी उपस्थित होते.