होमपेज › Solapur › चौकांमधील बजबजपुरी पुन्हा वाढली!

चौकांमधील बजबजपुरी पुन्हा वाढली!

Published On: Feb 22 2018 1:23AM | Last Updated: Feb 21 2018 9:11PMसोलापूर : इरफान शेख

दै. ‘पुढारी’च्या दणक्यानंतर सोलापूर शहरामधील चौकाचौकांतील अतिक्रमणे वाहतूक पोलिस प्रशासन व मनपा प्रशासनाच्यावतीने हटविण्यात आली. परंतु ही कारवाई काही काळापुरतीच होती, असे चित्र  आता समोर आले आहे. आसरा चौक, विजापूर रोड, शिवाजी चौक आदी परिसरांत अतिक्रमण ‘जैसे थे’  झाले असून रेल्वे स्टेशन परिसरातील  हातगाडीचालक, पानटपरीचालक, फळ विक्रेते यांनी कारवाईचा धसका घेत अतिक्रमणापासून दूर आपले व्यवसाय थाटले आहेत.

शहरात वाहतुकीचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. वाहनांची संख्या  दिवसेंविदस वाढत चालली आहे.शहरामधील मुख्य चौकांत  फळ विक्रेते, पानटपर्‍या, भजी गाड्या ,भाजी विक्रेते व इतर हातगाड्यांची संख्यादेखील वाढली आहे. याचे दुष्परिणामदेखील भयानक होत आहेत. कारण वाहतूक जाम होऊन वाहने धिम्यागतीने पुढे सरकत आहेत. वाहतूक शाखेवर वाहतूक कोंडीचा लोंढा वाढतच चालला आहे. शहरामधूनच महामार्ग गेल्याने दुपारच्या वेळेस जडवाहने शहरातून जाताना दिसतात.

आसरा चौक तर मृत्यूचा चौक झाल्यासारखी समस्या निर्माण झाली आहे. कारण वाहनांचा प्रचंड लोंढा या मार्गावर असतो. सिग्नलला चिकटून रिक्षास्टॉप असल्याने रिक्षाचालक बेशिस्तपणे सिग्नलवर थांबलेले असतात. काही रिक्षाचालकांना प्रवासी घेण्याच्या घाईगडबडीत सिग्नल सुटल्याचे भानदेखील राहात नाही.प्रवाशांसाठी सुटलेल्या सिग्नलवर थांबा घेत वाहतुकीच्या समस्येत भर घालतात. वाहतूक पोलिसांनी या रिक्षाचालकांचा थांबा थोडा पुढे केला तर वाहने सहजरित्या पुढे सरकतील.गेल्या काही दिवसांअगोदर आसरा चौकात एका चिमुरडीला जीवनदान मिळाले. ट्रकखाली सापडूनदेखील ती बचावली. या अपघाताने प्रशासनास जाग आली. लगेच कारवाईचा बडगा हातात घेत  चौकामधील सर्व अतिक्रमण हटविले. हातगाड्या, भजीगाड्या, पानटपर्‍या ताब्यात घेतल्या व दंडवसुली करत सोडूनदेखील दिल्या. फळ विक्रेत्यांनी फुटपाथला चिकटून पुन्हा आपले व्यवसाय थाटले आहेत.ज्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्‍न निर्माण होत आहे.

विजापूर महामार्गावरील पादचारी मार्गावर पादचार्‍यांना जाण्यासाठी जागाच नाही. फळ विक्रेत्यांनी व भाजी विके्रत्यांनी अतिक्रमण करत पादचारी मार्ग ताब्यात घेतले आहेत. येथे सुसाट वेगाने वाहने धावत असतात. अशावेळी पायी जाणारे  पादचारी मात्र जीव मुठीत घेऊन  रस्त्यावरुन जात असतात. 

रेल्वे  स्टेशनसमोरील बाजूस उभ्या असणार्‍या फळ विक्रेत्यांवर पोलिस प्रशासन व मनपा प्रशासनाने संयुक्तरित्या कारवाई करत स्टेशन परिसर अतिक्रमण मुक्त केला होता. कारवाईचा धसका घेत  येथील  हातगाडीचालकांनी पुन्हा अतिक्रमणाचा बाऊ न करता मागे सरकत आपला व्यायसाय थाटला आहे. 

शिवाजी चौक परिसर, पांजरा पोळ चौक, बसस्थानक परिसरातील अतिक्रमण ‘जैसे थे’ झाले आहे. फळ विके्रते, चहा स्टॉल, हातगाड्या पुन्हा रस्त्यावर आल्या आहेत. बसस्थानकाच्या भिंतीला लागूनच चहा स्टॉल थाटण्यात आले आहेत. या चहाटपरीवर चहा पिणारे शौकिन कसेही दुचाकी वाहने पार्किंग करुन वाहतुकीस अडथळा निर्माण करत असतात.