Wed, Jun 03, 2020 17:55होमपेज › Solapur › ‘स्मार्ट सिटी’ कामांच्या दर्जाकडे विशेष लक्ष द्या : चंद्रकांत दळवी

‘स्मार्ट सिटी’ कामांच्या दर्जाकडे विशेष लक्ष द्या : चंद्रकांत दळवी

Published On: Dec 15 2017 2:47AM | Last Updated: Dec 14 2017 8:41PM

बुकमार्क करा

सोलापूर :  प्रतिनिधी

‘स्मार्ट सिटी’ योजनेंतर्गत शहरात होणार्‍या कामांचा दर्जा कसा चांगला राहील याकडे विशेष लक्ष द्या, अशी सूचना विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी गुरुवारी सोलापुरात केली.स्मार्ट सिटी कंपनीच्या भागधारकांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे, महापौर शोभा बनशेट्टी, उपमहापौर शशिकला बत्तुल, पोलिस आयुक्त महादेव तांबडे, स्थायी समितीचे सभापती संजय कोळी, विरोधी पक्षनेते महेश कोठे, स्वतंत्र संचालक प्रा. नरेंद्र काटीकर, चंद्रशेखर पाटील, उपायुक्त त्रिबंक ढेंगळे-पाटील, नगरअभियंता लक्ष्मण चलवादी आदी उपस्थित होते. यावेळी स्मार्ट सिटी अंतर्गत होत असलेल्या रंगभवन ते डॉ. आंबेडकर चौक या दीड कि.मी.च्या मॉडेल  रस्त्यासह सोलर दिवे, स्वच्छतागृह, पाणीपुरवठा आदी योजनांचे सादरीकरण प्रोजेक्टरच्या माध्यमातून करण्यात आले. आगामी योजनांची माहितीही यावेळी देण्यात आली. कंपनीचे चार्टर्ड अकौंटंट अनंत जावडे यांनी कंपनीचा 2016-17 या आर्थिक वर्षाचा नफा-तोटा तसेच ताळेबंद पत्रक सादर केले. त्यास मंजुरी देण्यात आली. 

‘तो’ मार्ग खुला ठेवण्याची महापौरांची मागणी

या सभेत महापौर बनशेट्टी यांनी रंगभवन-डफरीनपर्यंतचा रस्ता सिद्धेश्‍वर यात्रेनिमित्त खुला करण्याची मागणी केली. या मार्गावरील सध्या होत असलेले काम यात्रेपूर्वी बंद करण्यात यावे. रस्त्याची स्वच्छता करून भाविकांची गैरसोय होणार नाही यादृष्टीने सोय करण्यात यावी. यात्रा संपल्यावर पुन्हा काम सुरू करण्यात यावे, असे विविध मुद्दे यावेळी महापौरांनी मांडले.  यावर आयुक्त तसेच नगरअभियंत्यांनी या रस्त्यावरील काम यात्रेआधी पूर्ण होईल असे सांगत यात्रा काळात हा रस्ता खुला करण्यासाठी कसलीही अडचण नसल्याचे स्पष्ट केले.

नंदीध्वज मार्गाची  22 डिसेंबर रोजी पाहणी 

सिद्धेश्‍वर यात्रेनिमित्त नुकतीच जिल्हाधिकार्‍यांनी बैठक घेतली. तद्नंतर आता महापौरांकडून सिद्धेश्‍वर यात्रेनिमित्त नंदीध्वज मार्गाची पाहणी 22 डिसेंबर रोजी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.