होमपेज › Solapur › डास, गटारमुक्त गावांसाठी विशेष उपक्रम

डास, गटारमुक्त गावांसाठी विशेष उपक्रम

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

नांदेड जिल्ह्याच्या धर्तीवर सोलापूर जिल्हा डासमुक्त व गटारमुक्त करण्यासाठी जि.प. अध्यक्ष संजय शिंदे, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी पुढाकार घेतला आहे. या उपक्रमासाठी 10 एप्रिल ते 30 जून याकालावधीत मोहीम राबविण्यास सुरुवात होत असून पहिल्या टप्प्यात प्रत्येक गावांत किमान 25 शोषखड्डे तयार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी 11 कोटी 78 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. 
जिल्हा परिषदेत नुकत्याच घेण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेत डॉ. राजेंद्र भारुड यांनी जि.प. पदाधिकारी, सदस्य व पंचायत समिती सभापती यांना या उपक्रमाची सविस्तर माहिती देऊन या उपक्रमात पुढाकार घेण्याचे त्यांना आवाहन केले. या योजनेसाठी आवश्यक निधी, प्रस्ताव, अर्ज आदींबाबतही सविस्तर माहिती यावेळी  त्यांनी दिली. 

ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबातील सांडपाणी शोषखड्ड्यात मुरविणे व गटारमुक्त गाव करुन गावात स्वच्छता व आरोग्याची नांदी लाभावी या हेतूने हा उपक्रम रोजगार हमी योजनेची सांगड घालून सुरू करण्यात येत आहे. एका शोषखड्ड्यांसाठी अंदाजे 4 हजार 584 रुपये इतका खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून लाभार्थ्यांना यासाठी 2 हजार 566 रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. उर्वरित निधी ग्रामपंचातीला प्राप्त असणार्‍या चौदावा वित्त आयोग, ग्रामपंचायत स्वनिधी किंवा लाभार्थी हिस्सा या माध्यमातून अपेक्षित धरण्यात आला आहे. 10 ते 13 एप्रिल याकालावधीत ग्रामपंचायतीने बैठक आयोजित करून गावातील लाभार्थी निवड निश्‍चित करायचे आहेत. 14 ते 18 एप्रिल याकालावधीत विशेष ग्रामसभा घेऊन लाभार्थी प्रस्ताव संकलित करून लाभार्थी निवड निश्‍चित करायची आहे. 19 ते 23 एप्रिल यादरम्यान ग्रामपंचायतीने प्रस्तावांना मान्यता व कार्यारंभ आदेश देऊन सर्व प्रस्ताव पंचायत समितीकडे सादर करावेत. 6  मे रोजी लोकप्रतिनिधींच्या हस्ते एकाच दिवशी शोषखड्डा कामांचा शुभारंभ करण्यात येईल. 30 जून रोजी गटविकास अधिकारी यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून लाभार्थ्यांना शोषखड्डे  पूर्णत्वाचे दाखले वितरित करावेत, असे नियोजन करण्यात आले आहे. 

30 जून रोजी ज्या गावात जास्तीत जास्त शोषखड्डे घेण्यात येतील व गटारमुक्त गाव होईल, अशा गावातील सरपंच, ग्रामसेवक यांचा सन्मान जि.प. अध्यक्ष संजय शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.  राजेंद्र भारुड यांच्या हस्ते जाहीर कार्यक्रमात करण्यात येईल. 

जि.प. अध्यक्ष संजय शिंदे, सीईओ डॉ. भारुड यांनी या उपक्रमासाठी विशेष पुढाकार घेत या योजनेच्या अंमलबजावणीसाठी अत्यंत सोयीस्कर व पारदर्शक प्रणाली प्रशासकीय यंत्रणा व ग्रामपंचायतीच्या हाती दिल्याने 30 जूनपर्यंत अनेक गावे गटारमुक्त होतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 


  •