Fri, Jul 19, 2019 13:27होमपेज › Solapur › सभापती बिनविरोध निवडीचा मार्ग विरोधकांकडूनच मोकळा!

सभापती बिनविरोध निवडीचा मार्ग विरोधकांकडूनच मोकळा!

Published On: May 16 2018 10:15PM | Last Updated: May 16 2018 10:12PMसोलापूर : प्रतिनिधी

बर्‍याच नाट्यमय घडामोडींनंतर महिला बालकल्याणसह सात विशेष समित्या सभापतिपदांसाठी विरोधकांनी उमेदवारी अर्ज दाखलच न केल्याने बिनविरोधचा मार्ग मोकळा झाला आहे. विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेनेच सत्ताधारी भाजपबरोबर युती केल्याने विरोधकच उरला नसल्याचे चित्र आहे. 

काही समित्यांवर हट्ट धरून बसल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी, बसपा आणि शिवसेना एकत्र येऊ शकले नाहीत. एमआयएमने तर अगोदरपासून तटस्थ भूमिका जाहीर केली होती. उमेदवारी अर्ज भरण्यास पाऊण तास बाकी असताना भाजपातील एका गटाने शिवसेनेसमोर युतीचा प्रस्ताव ठेवल्याचे सांगितले. त्यानुसार हालचालींना वेग आला होता. कमी कालावधीतही महेश कोठे यांनी षटकार ठोकत आपल्या पदरी तीन जागा पाडून घेण्यात यशस्वी ठरले. 

विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेला भाजपच्या कोणत्या गटाबरोबर राहावे याविषयी पेच निर्माण झाला असल्याचे विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी सांगितले. सर्व विरोधकांना बरोबर घेऊन जावे तर काही समित्यांचा हट्ट धरल्याने विरोधक एकत्र येत नव्हते, तर भाजपतील दोन गटांमुळे आमचे सँडवीच होत असल्याची प्रतिक्रियाही कोठे यांनी दिली. 

अशात जबाबदारीचे पद असलेल्या महापौर, सभागृहनेते यांच्याशी बोलणी करुन महेश कोठे यांनी शिवसेना, भाजप युती करण्याचे ठरवले. त्यानुसार भाजपला महिला व बालकल्याण समिती, शहर सुधारणा समिती, आरोग्य समिती, समाजकल्याण समिती अशा चार, तर स्थापत्य, विधी, उद्यान समिती अशा तीन समिती शिवसेनेला सोडण्याचे जाहीर झाले. त्यानुसार प्रत्येकी अर्ज नगरसचिवांकडे वेळेत दाखल केला. यावर गुरुवारी शिक्‍कामोर्तब होणार आहे. 

याबाबत काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे यांनी भाजपमध्ये सहकारमंत्री, पालकमंत्री गटामध्येच वाद असल्याने  इतर पक्षांचा विचार केला जात नसल्याचे म्हटले. काँग्रेस पक्षाला महिला बालकल्याण समिती हवी म्हणून  भाजपचे शहराध्यक्ष, सभागृहनेत्यांकडे बोलणी झाली होती. मात्र ऐनवेळी यांच्यात गटबाजी चालू झाल्याने आपण निवडणुकीवर बहिष्कार टाकत असल्याचे चेतन नरोटे यांनी जाहीर केले. 
बसपा-माकपाचे गटनेते आनंद चंदनशिवे यांनी विरोधी पक्ष आणि सत्ताधारी सत्तेसाठी एकत्रित येतात, त्यांना शहर विकासाशी देणे-घेणे नाही. विषय समित्या या फक्‍त कार्यालये थाटणे, पाट्या लावण्यापुरत्या असून वर्षभरात एकदाही बैठक होत नसल्याची तक्रार चंदनशिवे यांनी करत निवडणूक प्रक्रियेत तटस्थ राहणार असल्याची प्रतिक्रिया दिली. सत्ताधारी भाजप-विरोधी पक्ष शिवसेना यांच्यात युती झाल्याचे जाहीर होताच त्यांच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल करुन बाहेर येऊन विजयाची खूण दाखविली. यावेळी विरोधी पक्षनेते महेश कोठे,  सभागृहनेते संजय कोळी, उमेदवार गुरुशांत धुत्तरगावकर, रामेश्‍वर बिर्रु, कुमुद अंकाराम, विनायक कोंड्याल, प्रथमेश कोठे, अंबिका पाटील यांची उपस्थिती होती.