Sun, Jul 21, 2019 08:31होमपेज › Solapur › ‘सॉलीवूड’ घेतेय भरारी!

‘सॉलीवूड’ घेतेय भरारी!

Published On: Jan 31 2018 10:57PM | Last Updated: Jan 31 2018 9:09PMसोलापूर :  वेणुगोपाळ गाडी

एकेकाळी गिरणगाव म्हणून सुपरिचित असणारे सोलापूर शहर टेक्स्टाईल, विडी उद्योगानंतर आता चक्‍क ‘सॉलीवूड’ नावे चित्रपटनिर्मितीबद्दल नावारुपाला येत आहे. अलीकडे येथील चित्रपटनिर्मितीमध्ये मोठी वाढ होत असून ‘म्होरक्या’च्या यशाने ‘सॉलीवूड’च्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. 

पूर्वी चित्रपटनिर्मितीबाबत मुंबई, कोल्हापूर, पुणे या शहरांचीच मक्‍तेदारी होती; पण आता ही मक्‍तेदारी मोडून काढत सोलापूरने आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले आहे. त्यामुळे सोलापूरला चित्रपटसंबंधित परिभाषेत ‘सॉलीवूड’ या नावाने संबोधले जाऊ लागले आहे.  सुमारे 25 वर्षांपूर्वी सोलापूरच्या षण्मुख लोमटे यांनी  ‘सिद्धेश्‍वर माझा पाठीराखा’ या भक्‍तिरस चित्रपटाची निर्मिती केली होती. या चित्रपटाच्या माध्यमातून सोलापूरकरांनी सिनेनिर्मितीत एकप्रकारे चंचूप्रवेश केला होता. त्यानंतर अलीकडील काही वर्षांमध्ये सोलापुरात मराठी, हिंदी चित्रपट, लघुपट, माहितीपट काढण्याचे प्रमाण वाढले  आहे. एवढेच नव्हे तर मूळचे सोलापूरचे असणारे अनेक दिग्दर्शक, कलावंत, गायक, संगीतकार, तंत्रज्ञ आदी मंडळी पुणे, मुंबई येथे बड्या बॅनरवर काम करीत आहेत. 

‘सैराट’ने रचला इतिहास

‘फॅण्ड्री’नंतर ‘सैराट’चे दिग्दर्शन करून सोलापूरचे सुपुत्र नागराज मंजुळे यांनी चित्रपट क्षेत्रात इतिहास रचत सोलापूरचे मोठे नाव करण्याची किमया साधली. यामध्ये ‘आर्ची’ची भूमिका साकारणार्‍या रिंकू राजगुरु हिनेदेखील मोलाची भर घातली. शेखर ज्योती यांनी ‘अनवट’, ‘मितवा’ यासारख्या बड्या चित्रपटांची निर्मिती केली. खा. शरद बनसोडे हे राजकारणात येण्यापूर्वी ‘मुंबई आमचीच’, ‘मी हवी का ती हवी’ या चित्रपटांची निर्मिती करून त्यात प्रमुख भूमिकाही साकारली होती. अमोल व सायली जोशीनिर्मित ‘हंपी’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. अक्षय इंडीकर दिग्दर्शित ‘उदाहरणार्थ नेमाडे’, बाबुराव माने निर्मित ‘चला भारतीयांनो एक होऊ या’, ‘भोग’, ‘कुंकू’, पवन बनसोडे निर्मित ‘दहावीची एैसी की तैसी’, ‘बार्शी के शोले’, नम्रता कोळगे निर्मित-दिग्दर्शित ‘पल्याडवासी’, टेक्सास गायकवाड निर्मित ‘करु का सरू’ अशरफ खान निर्मित ‘सिनमायेडा’ आदी चित्रपट प्रदर्शित झाले. एजाज शेख यांनी ‘हू इज देअर’, ‘लाईफ की एैसी की तैसी’ या हिंदी चित्रपटांची निर्मिती करुन बॉलीवूडमध्ये सोलापूरचे नाव केले.  डॉ. सतीश वळसंगकर निर्मित ‘तडफ’, इरण्णा कचेरीनिर्मित ‘शिवयोगी सिद्धरामेश्‍वर’, प्रफुल्ल मस्के निर्मित ‘निर्दोष’, आनंद झिंगाडे निर्मित ‘सिद्धलीला’, नरेश कोंगारी यांचा ‘बद्री’, मकरंद माने यांचे ‘रिंगण’ आदी चित्र-लघुपटही पडद्यावर झळकले आहेत. ‘एलिझाबेथ एकादशी’ हा प्रसिद्ध झालेला चित्रपट सोलापूकरांनी निर्मित-दिग्दिर्शत केला नसला तरी हा चित्रपट पंढरपुरात चित्रीत करण्यात आला होता. यामध्ये पंढरपूर, अकलूज अर्थात स्थानिक कलाकारांना वाव मिळाला होता. 

‘म्होरक्या’ने मारली बाजी 

सोलापूरच्याच कल्याण पडाल निर्मित व बार्शीचे अमर देवकर दिग्दर्शित ‘म्होरक्या’ या चित्रपटाने पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात एकूण तीन पुरस्कार मिळवून सिनेजगतात चमकदार कामगिरी केली आहे.  अस्सल सोलापुरी निर्मिती असलेल्या या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट कलाकार, सर्वोत्कृष्ट अभिनय, सर्वोत्कृष्ट संकलनाचे पुरस्कार मिळाले आहेत. हा चित्रपट वितरित करण्यासाठी मोठी मागणी येत असल्याने व्यावसायिकदृष्ट्या या चित्रपटाला यश मिळण्याचे संकेत आहेत. 

अनेक चित्रपटनिर्मिती अवस्थेत वा प्रदर्शनाच्या वाटेवरआगामी भाग्यनारायण क्रिएशन निर्मित ‘रोल नं. 18’, पवन बनसोडे निर्मित ‘ट्रिपल’, ‘लोकल’, शेखर इंगळे निर्मित ‘द जजमेंट ऑफ प्रेसिडेंट’, प्रमोद सरवदे निर्मित ‘सोलापूरचा गँगवार’, ‘कागरं’, अमोल वाघमारे निर्मित ‘कायरं’, ‘नमो’, कीर्तीपाल गायकवाड यांचा ‘महात्मा ज्योतिबा फुले’, आनंद सरवदे यांचा ‘यल्लम्मा’, प्रफुल्ल मस्के निर्मित ‘तुटका’, डॉ. नितीन तोष्णीवाल हे ‘जगावेगळी अंत्ययात्रा डॉट. कॉम.’ आदी चित्रपटांची निर्मिती होत आहे. यातील काही चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत.  एकंदर चित्रपट क्षेत्रात ‘सॉलीवूड’ भरारी घेत आहे. या माध्यमातून चित्रपट क्षेत्रात सोलापूरचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण होण्याबरोरच स्थानिक टॅलेंटलाही वाव मिळत आहे. याद्वारे अनेक कलाकार, निर्माते, दिग्दर्शक, तंत्रज्ञ नावारुपाला आले व येत आहेत. त्यामुळे आगामीकाळात सिनेसृष्टीत सोलापूरचा दबदबा निर्माण होईल, अशी आशा आहे.