होमपेज › Solapur › प्रवासी म्हणून बसले अन् कार चोरून नेली

प्रवासी म्हणून बसले अन् कार चोरून नेली

Published On: Apr 18 2018 10:26PM | Last Updated: Apr 18 2018 9:59PMसोलापूर : प्रतिनिधी

प्रवासी म्हणून टाटा कार चोरून नेणार्‍या टोळीतील एकास सोलापूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक करुन चोरीस गेलेली कार जप्त केली.अभिजित विष्णू हजारे (रा. हजारे वस्ती, करमाळा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत बसवराज नेहरू बिराजदार (वय 21, रा. कोथळी, ता. उमरगा, जि. उस्मानाबाद, सध्या रा. सर्व्हे नं. 32, कोंढवा, पुणे) याने दिलेल्या फिर्यादीवरुन पांगरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बसवराज बिराजदार हा कारचालक असून 21 जानेवारी 2018 रोजी तो पुणे स्टेशन चौक येथे त्याची एमएच 25 टी 1304 ही टाटा झेस्ट कार घेऊन प्रवासी घेण्यासाठी थांबला होता. त्यावेळी चार अनोळखी लोक आले व त्यांनी बिराजदार यास सोलापूर येथे सोडता का असे विचारून 3500 रुपये भाडे देण्याचे ठरले. इंदापूर येथे आल्यानंतर गाडीतील एकाने आपण सोलापूर न जाता तुळजापूरला जाऊ, तुला भाडे वाढवून देऊ असे सांगितल्याने बिराजदार याने गाडी कुर्डूवाडी-बार्शी रस्त्याने नेली. चिखर्डे गावाजवळ गाडीतील प्रवाशांनी लघुशंकेसाठी थांबविली. त्यावेळी बिराजदार हा लघुशंका करीत असताना गाडीतील प्रवासी म्हणून बसलेल्या चोरट्यांनी गाडी चालू करुन उस्मानाबादच्या दिशेने पळवून नेली म्हणून पांगरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या गुन्ह्याचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळालेल्या माहितीवरुन अभिजित हजारे यास ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी त्याने हा गुन्हा सीताराम सलगर व इतर दोघांच्या मदतीने केल्याचे सांगून चोरलेली गाडी सीताराम सलगर याच्याकडे असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी सलगर याच्या घरासमोरुन गाडी जप्त केली असून हजारे यास अटक करण्यात आली आहे. इतर आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विजय कुंभार यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक रियाज शेख, हवालदार विजयकुमार भरले, दिलीप राऊत, रवी माने, लालसिंग राठोड, आनंद चमके, पांडुरंग काटे, आनंद डिगे यांनी केली.