होमपेज › Solapur › सोलापूर : मावस बहिणीचा खून; वकिलाच्या कोठडीत वाढ

सोलापूर : मावस बहिणीचा खून; वकिलाच्या कोठडीत वाढ

Published On: Feb 22 2018 10:26PM | Last Updated: Feb 22 2018 10:26PM



सोलापूर : प्रतिनिधी

प्रेमसंबंधातून मावस बहिणीच्या खून प्रकरणात जोडभावी पेठ पोलिसांनी वकिलास अटक केलेल्या वकिलाच्या पोलिस कोठडीमध्ये चार दिवसांची वाढ करण्याचा आदेश न्यायदंडाधिकारी माहेश्‍वरी पटवारी यांनी दिला. 

अ‍ॅड. रविदास दिनकर सरवदे (वय 31, रा. मड्डी वस्ती) असे पोलिस कोठडी मिळालेल्याचे नाव आहे. याबाबत पांडुरंग विठ्ठल भोसले (रा. सरवदे नगर, मुळेगाव  रोड) यांनी दिलेल्या  फिर्यादीवरून युवराज सरवदे, विनोद  सरवदे, किशोर  सरवदे, अनिल सरवदे, प्रभाकर भोसले (रा. जोशी गल्ली, सोलापूर), विष्णू भोसले (रा. मड्डी वस्ती, सोलापूर) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अ‍ॅड. सरवदे यांचा सहभाग निष्पन्न झाल्याने अ‍ॅड. सरवदे  यांना  जोडभावी पेठ पोलिसांनी  त्यास  अटक करुन सोमवारी न्यायदंडाधिकारी देवकाते यांच्यासमोर हजर  केले  होते. राजश्री भोसले (वय 21, रा. जोशी गल्ली, सोलापूर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

राजश्री भोसले ही महिला ईश्‍वर भोसले याच्याबरोबर प्रेमसंबंधातून 2016 मध्ये  पळून गेली होती. त्यानंतर राजश्री हिला तिच्या नातेवाईकांनी शोधून  मुंबई येथून परत आणले. त्यानंतर काही दिवसानंतर राजश्री हिचा विष्णू भोसले याच्या घरात संशयास्पदरित्या मृत्यू झाला. राजश्री हिचा मृत्यू झाला नसून खून  करण्यात आल्याबाबत निनावी पत्र पोलिस आयुक्‍तांना पाठविण्यात आले होते. त्या पत्राची चौकशी करुन अखेर 2 जुलै 2016 रोजी जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात युवराज सरवदे, विनोद  सरवदे, किशोर  सरवदे, अनिल सरवदे, प्रभाकर भोसले, विष्णू भोसले यांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन दिला आहे.

अ‍ॅड. सरवदे   हे  मृत   राजश्रीचे मावस    भाऊ  असून  त्यांनी   महापालिकेतून    राजश्रीचा  मृत्यू दाखला मिळविल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले  आहे. पोलिसांच्या तपासामध्ये  या गुन्ह्यामध्ये अ‍ॅड. रविदास सरवदे याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने जोडभावी पेठ पोलिसांनी सरवदेस अटक करुन सोमवारी न्यायालयात हजर पोलिस कोठडी घेतली 
होती. 

पोलिस कोठडीची मुदत संपल्याने गुरुवारी पुन्हा अ‍ॅड. सरवदे यास न्यायालयात हजर करण्यात आले असता पोलिस कोठडी वाढविण्यात आली. सहायक पोलिस निरीक्षक बी. एच. पाटील तपास करीत आहेत.

याप्रकरणी  सरकारच्यावतीने अ‍ॅड. विद्या बनसोडे यांनी, तर आरोपीकडून अ‍ॅड. शशी कुलकर्णी, अ‍ॅड. प्रशांत नवगिरे काम पाहात आहेत.