Wed, Nov 14, 2018 10:06



होमपेज › Solapur › मावस बहिणीच्या खुनाच्या गुन्ह्यात वकिलाची रवानगी न्यायालयीन कोठडीत

मावस बहिणीच्या खुनाच्या गुन्ह्यात वकिलाची रवानगी न्यायालयीन कोठडीत

Published On: Feb 27 2018 8:20AM | Last Updated: Feb 26 2018 10:28PM



सोलापूर : प्रतिनिधी

प्रेमसंबंधातून  पळून गेलेल्या मावस बहिणीच्या खूनप्रकरणात वकिलास न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायदंडाधिकारी माहेश्‍वरी पटवारी यांनी दिला. अ‍ॅड. रविदास दिनकर सरवदे (वय 31, रा. मड्डी वस्ती) असे पोलिस कोठडी मिळालेल्याचे वकीलाचे नाव आहे. याबाबत पांडुरंग विठ्ठल भोसले (वय 45, रा. सरवदे नगर, मुळेगाव  रोड, सोलापूर) यांनी दिलेल्या  फिर्यादीवरुन युवराज सरवदे, विनोद  सरवदे, किशोर  सरवदे, अनिल सरवदे, प्रभाकर भोसले (रा. जोशी गल्ली, सोलापूर), विष्णू भोसले (रा. मड्डी वस्ती, सोलापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अ‍ॅड. सरवदे यांचा सहभाग निष्पन्न झाल्याने अ‍ॅड. सरवदे  यांना  जोडभावी पेठ पोलिसांनी  त्यास  अटक करून न्यायालयात  हजर  केले  होते. राजश्री भोसले (वय 21, रा. जोशी गल्ली, सोलापूर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

राजश्री भोसले ही महिला ईश्‍वर भोसले याच्याबरोबर प्रेमसंबंधातून 2016 मध्ये  पळून गेली होती. त्यानंतर राजश्री   हिला  तिच्या नातेवाईकांनी शोधून  मुंबई येथून परत आणले. त्यानंतर काही दिवसानंतर राजश्री हिचा विष्णू भोसले याच्या घरात संशयास्पदरित्या मृत्यू झाला. राजश्री हिचा मृत्यू झाला नसून खून  करण्यात आल्याबाबत निनावी पत्र पोलिस आयुक्तांना पाठविण्यात आले होते. त्या पत्राची चौकशी करुन अखेर 2 जुलै 2016 रोजी जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात युवराज सरवदे, विनोद  सरवदे, किशोर  सरवदे, अनिल सरवदे, प्रभाकर भोसले, विष्णू भोसले यांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन दिला आहे. या गुन्ह्यात  जोडभावी पेठ पोलिसांनी अ‍ॅड. सरवदेस अटक करुन  न्यायालयात हजर करुन  पोलिस कोठडी घेतली होती. पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यास सोमवारी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यास न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. सहायक पोलिस निरीक्षक बी. एच. पाटील तपास करीत आहेत.याप्रकरणी  सरकारच्यावतीने अ‍ॅड. विद्या बनसोडे यांनी, तर आरोपीकडून अ‍ॅड. शशी कुलकर्णी, अ‍ॅड. प्रशांत नवगिरे काम पाहात आहेत.