Sat, Dec 07, 2019 23:14होमपेज › Solapur › ‘हर्र ऽ ऽ बोला हर्र ऽ ऽ’चा जयघोष घुमणार शुक्रवारपासून

‘हर्र ऽ ऽ बोला हर्र ऽ ऽ’चा जयघोष घुमणार शुक्रवारपासून

Published On: Jan 10 2018 2:00AM | Last Updated: Jan 09 2018 10:24PM

बुकमार्क करा
सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्‍वरांच्या यात्रेच्या धार्मिक विधीस बुधवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास योगदंडाच्या पूजेने सुरूवात होणार असल्याची माहिती हिरेहब्बू वाड्यात  घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत राजशेखर हिरेहब्बू यांनी दिली. सिद्धेश्‍वर देवस्थानामध्ये धर्मराज काडादी यांनी सिद्धेश्‍वर महायात्रेतील प्रमुख धार्मिक कार्यक्रमांची माहिती दिली.

दरम्यान, 11 जानेवारीला सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास रूढी परंपरेप्रमाणे सिद्धरामेश्‍वरांच्या हातातील योगदंड उत्तर कसबा येथून शुक्रवार पेठ येथील कै. रामचंद्रप्पा  शेटे यांच्या वाड्यात नेऊन तेेथे मानकरी हिरेहब्बू यांच्या हस्ते पूजा करून पुन्हा होमहवन व पादपूजा करण्यात  येते.

12 जानेवारीला शिवानंद हिरेहब्बू यांच्या वाड्यात पहिल्या व दुसर्‍या नंदीध्वजास साज चढविण्याचा कार्यक्रम घेऊन मानकरी हिरेहब्बू व देशमुख यांच्या हस्ते पूजा करण्यात येणार आहे. राजशेखर हिरेहब्बू व देशमुख यांच्या हस्ते पूजा करून यात्रेस प्रारंभ करण्यात येतो. त्यानंतर सिद्धेेश्‍वर प्रशाला व कलेक्टर कचेरीच्या जुन्या फाटकाजवळ 1 ते  7 काठ्या आल्यानंतर तेथे शासकीय पूजा करण्यात येणार आहे. यानंतर शहरातील 68 लिंगांपैकी पहिले लिंग अमृत लिंगाजवळ सर्व काठ्या आल्यानंतर हिरेहब्बू व शेटे तैलाभिषेक घालून लिंगाची विधीवत पूजा करतात. त्यानंतर सर्व मानकर्‍यांना विडा देण्यात येतो. त्यानंतर 68 लिंगास यण्णीमज्जनास (तैलाभिषेक) प्रारंभ करून सर्व लिंगांना प्रदक्षिणा घालून रात्री 9 वाजता हिरेहब्बूच्या वाड्यात एकत्र येतात.

13 जानेवारीला सकाळी  सात वाजता शिवानंद हिरेहब्बू यांच्या वाड्यात हिरेबब्बू व देशमुख यांच्या हस्ते पूजा होऊन मिरवणुकीने मंदिरात अक्षता सोहळ्यासाठी संमती कट्ट्याजवळ येतात. येथे सातही नंदीध्वज आल्यानंतर श्री सिद्धेरामेश्‍वरांच्या  हातातील योगदंडाच्या साक्षीने सुगडी पूजा हिरेहब्बू व देशमुख करतात. त्यानंतर कुंभार यांना हिरेहब्बू यांच्या हस्ते विडा दिला जातो. अशाप्रकारे पंरपरेनुसार अक्षता सोहळ्याचा कार्यक्रम पार पडणार असल्याची माहिती राजशेखर हिरेहब्बू यांनी दिली.

14 जानेवारीला सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास हिरेहब्ब व देशमुख यांच्या हस्ते पूजा करून मिरवणुकीने संमती कट्ट्याजवळ येणार आहे व तेथे आल्यावर प्रथम श्री शिवयोगी सिद्धरामेश्‍वरांच्या योगदंडास करमुटी लावून त्या योगदंडास स्नान घालणार आहेत व नंतर पालखीमधील मूर्तीस करमुटी  लावून स्नान घालतात. सायंकाळी 5 वा पूजा करून मिरवणुकीस सुरूवात होते. जुन्या फौजदार चावडीजवळ पहिल्या नंदीध्वजास नागफणी बांधतात. 2 ते 7 नंदीध्वजास बाशिंग बांधण्यात येतात. त्यानंतर नंदीध्वज होम मैदानापर्यंत आणतात. तेथे हिरेहब्बू होमकुंडात उतरून बाजरीच्या पेंढीच्या तयार केलेल्या कुंभार कन्येस शालू, मणीमंगळसूत्र, बांगड्या, जोडवे, हारदांडा घालून त्या कुंभार कन्येस सजवतात. त्यानंतर पूजा करून अग्नी देतात. त्यानंतर प्रदक्षिणा घालून तीळगुळाचा कार्यक्रम करण्यात येतो. याचबरोबर हिरेहब्बू वासराची पूजा करून त्याची भूक भागवून  त्या वर्षाचे भविष्य सांगतात. यादिवशी रात्री 1 वाजेपर्यंत विधी पार पाडण्याचे कार्यक्रम सुरू असतात. 15 जानेवारीला सायंकाळी नंदीध्वज होम मैदानावर येतात व शोभेचे दारुकाम झाल्यावर नंदीध्वज परत मंदिरात येतात. 1 ते 5 नंदीध्वज गर्भ मंदिरास पाच प्रदक्षिणा घालतात व त्यानंतर 6 व 7 नंदीध्वज पाच प्रदक्षिणा घालतात. 16  ला यात्रेची सांगता कप्पड कळीच्या कार्यक्रमाने करण्यात येते. अशी माहिती राजशेखर हिरेहब्बू यांनी  दिली. यावेळी शिवानंद हिरेहब्बू,  राजशेखर हिरेहब्बू, मनोज हिरेहब्बू, जगदीश हिरेहब्बू, विनोद हिरेहब्बू, प्रदीप हिरेहब्बू, संजय हिरेहब्बू, संतोष हिरेहब्बू,विकास हिरेहब्बू,धनेश हिरेहब्बू आदी उपस्थित होते.

हे आहेत नंदीध्वजाचे मानकरी...
पहिला नंदीध्वज ः बहिरो पाटील राजू, दुसरा नंदीध्वज ः बाळासाहेब दगापाटील, तिसरा नंदीध्वज ः रेवणसिद्ध मायनाळे , चौथा व पाचवा नंदीध्वज ः श्री विश्‍वब्राम्हण समाज कालिका मंदिर सेवा मंडळ ट्रस्ट, सहावा नंदीध्वज ः प्रकाश बनसोडे, सातवा नंदीध्वज ः मारुती बनसोडे, मच्छिंद्र बनसोडे.

सुवर्ण सिद्धेश्‍वर संकल्पना लवकरच पूर्ण
सुवर्ण सिद्धेश्‍वर संकल्पना लवकरच पूर्ण होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत धर्मराज काडादी यांनी सांगितली. यासाठी देणगी स्वरुपात चांदी 450 कि.ग्रॅ., सोने 950 ग्रॅम व रोख रक्कम 4 कोटी 90 लाख देणगीमध्ये  मंदिराला आली आहे. सोन्यासारखा दिसणारा कळस मंदिरावर बसवण्यात आला आहे.

महायात्रेमध्ये 24 सीसीटीव्ही
सिद्धेेश्‍वर महायात्रेमध्ये कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार होऊ नये व त्यावर नियंत्रणासाठी मंदिर परिसरात 24  सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. चोरी, लूट, अतिप्रसंग, छेडछाड आदी बाबी लगेच लक्षात येण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे.