Tue, Jun 25, 2019 15:08होमपेज › Solapur › कुंभार समाजाकडून मानकर्‍यांना घागरी स्वाधीन

कुंभार समाजाकडून मानकर्‍यांना घागरी स्वाधीन

Published On: Jan 12 2019 1:33AM | Last Updated: Jan 11 2019 11:25PM
उत्तर सोलापूर ः प्रतिनिधी

900 वर्षांपासून चालत आलेल्या सिद्धेश्‍वर यात्रेमध्ये कुंभार कन्येने सिद्धेश्‍वरांच्या योगदंडासोबत विवाह केला होता. यात्रेतील अक्षता सोहळ्यासाठी कुंभार वाड्याला मोठे महत्त्व आहे. देशमुख , हिरेहब्बू , शेटेवाडा त्याचप्रमाणे कुंभार वाड्यालाही मान आहे. सिद्धेश्‍वरांनी स्थापन केलेल्या 68 लिंगांना तैलाभिषेक घातला जातो. त्याकरिता  शुक्रवारी कुंभार कुटुंबाकडून 56 घागरींची पूजा करून  त्यामध्ये हळद आणि तेल घालून मानकरी हिरेहब्बूंना देण्यात आल्या. मानकर्‍यांनी घागरी  स्वीकारल्या. घागरीमध्ये भक्तगण तेल आणि हळद घालतात. हे घेऊन हिरेहब्बू 68 लिंगांना तैलाभिषेक करतात.

सिद्धेश्‍वरांनी विवाह सोहळ्यासाठी तैलाभिषेक स्वतःला करून घेण्यास नकार देत लिंगांना देण्याची सूचना केल्याचे सांगितले जाते. त्यानुसार हा विधी केला जातो. 14 जानेवारी रोजी अक्षता सोहळ्यापूर्वी कुंभार वाड्याजवळ नंदीध्वजांची पालखीची विधीवत पूजा होते. नंदीध्वजास खोबरे, लिंबाचा हार घालून सुगडी पूजा होते. अक्षता सोहळ्यानंतर पंचामृत अभिषेक होतो. अमृत लिंगाला तैलाभिषेक करून 68 लिंगांना तैलाभिषेकास सुरुवात होते म्हणून प्रथेप्रमाणे कुंभार वाड्यातून घागरी दिल्या जातात.