Wed, Mar 20, 2019 02:33होमपेज › Solapur › श्रीमंतयोगी प्रतिष्ठानतर्फे पर्यावरण रक्षणाची प्रतिज्ञा

श्रीमंतयोगी प्रतिष्ठानतर्फे पर्यावरण रक्षणाची प्रतिज्ञा

Published On: Feb 19 2018 4:22PM | Last Updated: Feb 19 2018 4:22PMसोलापूर : प्रतिनिधी 

श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानच्या वतीने छात्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना देत, युवकांनी पर्यावरण रक्षणाची प्रतिज्ञा घेतली. श्रीमंतयोगी प्रतिष्ठानच्यावतीने शिवजयंती आगवेगळ्या पध्दतीने साजरी करण्यात आली. छत्रपती शिवरायांच्या आश्वारूढ पुतळ्यास सोमवारी सकाळी प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी मानवंदना दिली. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो या घोषणांनी  परिसर दणाणुन गेला होता. प्रारंभी मारवाडी युवा मंचाचे सल्लागार श्रीनिवासन दायमा,प्रतिष्ठानाचे संस्थापक अध्यक्ष महेश कासट यांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 
यावेळी बहुसंख्य युवकांनी जल-वायु-ध्वनी-प्रदुषण होऊ देणार नाही अशी प्रतिज्ञा घेतली. तसेच पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. याप्रसंगी प्रशांत हिबारे, मयुर गवते,बसवराज जमखडी, गोविंद बच्चल, अक्षय गायकवाड़, दिपक बुलबुले, निखील गव्हाणे, शुभम हंचाटे, ओंकार भावसार आदि सह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
भारत माझा देश आहे.

ही भारतभूमी वैविध्यपूर्ण वनसंपदेने समृद्ध आहे.

या भारतभूमीत वसलेले हिमालय, जंगले, पर्वत, नद्या, तळी, सरोवरे, धरणे ही आधुनिक भारताची तीर्थस्थाने आहेत.

या भारतभूमीतील समृद्ध आणि सुंदर निसर्गाचे रक्षण करणे हे माझे कर्तव्य आहे. त्यासाठी मी प्रयत्न करीन. मी एकही झाड तोडणार नाही, या उलट मी माझ्या वाढदिवसाला नवीन झाड लावीन. 

मी माझ्या घरात छपरावर पडणारा प्रत्येक थेंब माझ्याच अंगणात जिरवीन.

पाणी ही आपली राष्ट्रीय संपत्ती आहे. मी पाण्याचा जपून आणि काटकसरीने वापर करीन.

वीजबचतीसाठी मी कटिबद्ध आहे. 

आवश्यक नसताना मी पंखे, लाइट लावणार नाही.

मी घरातला कचरा कचराकुंडीत टाकेन.

कापडी पिशवी वापरेन.

मी माझ्या घरातील टी.व्ही.चा आवाज कमी ठेवीन.

मी माझ्या वागणुकीने जल-वायू-ध्वनी प्रदूषण होऊ देणार नाही.

मी पर्यावरणाचे रक्षण करीन.