Sun, Aug 25, 2019 19:26होमपेज › Solapur › होमप्रदीपन भक्तिभावाने

होमप्रदीपन भक्तिभावाने

Published On: Jan 16 2018 2:17AM | Last Updated: Jan 15 2018 8:09PM

बुकमार्क करा
सोलापूर : प्रतिनिधी

ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्‍वरांच्या यात्रेतील चौथ्या दिवशी नंदीध्वजांच्या साक्षीने होमविधीचा सोहळा मध्यरात्री 2 वाजून 10 मिनिटांनी भक्तिभावाने पार पडला. यावेळी उपस्थित भाविकांनी होमाला प्रदक्षिणा घालून दर्शन घेतले. होम मैदानावरील होमकुंडात झालेल्या या धार्मिक कार्यक्रमाच्यावेळी होटगी मठाचे मठाधीश धर्मरत्न श्री. ष.ब्र. डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांच्यासह सिद्धेश्‍वर भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

असा झाला सोहळा

रविवारी, होम मैदानावर झालेल्या होमविधीसाठी मानाच्या सातही नंदीध्वजांची मिरवणूक सायंकाळी पाच वाजता बाळी वेस येथील मल्लिकार्जुन मंदिराजवळील हिरेहब्बूंच्या मठातून निघाली. तत्पूर्वी हिरेहब्बू व देशमुख या मानकर्‍यांच्या हस्ते मानाच्या नंदीध्वजांची पूजा करण्यात आली. त्यानंतर पारंपरिक वाद्यांच्या निनादात ही मिरवणूक होम मैदानाकडे मार्गस्थ झाली.
जुनी फौजदार चावडीनजीक पसारे वाड्याजवळ मिरवणूक आल्यानंतर त्याठिकाणी पहिल्या नंदीध्वजाला नागफणी बांधण्यात आली. मानाच्या अन्य सहा नंदीध्वजांना बाशिंग बांधून विद्युतरोषणाई करण्यात आली होती. 

नागफणीचे नंदीध्वजधारक सोमनाथ मेंगाणेे व नंदीध्वज उचलून देणारे योगेश म्हमाणे, गंगाधर पाटील, शिवानंद सोन्ना, सचिन बहिरोपाटील आदी मास्तरांचा हिरेहब्बूंच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दिवसभर उपवास केलेले सोमनाथ मेंगाणेे यांनी नागफणी बांधलेला नंदीध्वज होमकट्ट्यापर्यंत आणून सिद्धेश्‍वरचरणी सेवा अर्पण केली. 

होमविधीसाठी मांडव घालून होमकट्टा फुलांनी सजविण्यात आला होता. नंदीध्वजांचे होमकट्ट्याजवळ रात्री 1 वाजून 35 मिनिटांनी आगमन झाल्यानंतर उपस्थित भाविकांनी श्री सिद्धेश्‍वर महाराजांचा जयजयकार केला. त्यानंतर होमकुंडात उतरून मानकरी हिरेहब्बू यांनी होमविधीला सुरुवात केली. कुंभार कन्येचे प्रतीक म्हणून बाजरीच्या पेंढीस शालू नेसवून, मंगळसूत्र, जोडवे, हार-दांडा आदी सौभाग्य अलंकार घालून सजविण्यात आले. विधिवत पूजा झाल्यानंतर होमप्रदीपनाचा कार्यक्रम झाला. उपस्थित भाविकांनी होमाला फळे अर्पण करून मनोभावे दर्शन घेतले. सिद्धेश्‍वर महाराजांचा जयघोष करीत पालखी व नंदीध्वजधारकांनी होमास पाच प्रदक्षिणा घातल्या. त्यानंतर उपस्थितांनी मकर संक्रांतीनिमित्त एकमेकांना तिळगूळ देऊन शुभेच्छा दिल्या. 
अनर्थ टळला
ग्रामदैवत सिद्धेश्‍वर महायात्रेच्या तिसर्‍या दिवशी होमहवन विधीला जात असताना कालिका मंदिराजवळ नागफणी नंदीध्वजाचा तोल जाऊन समोरील विद्युत डीपीवर पडला.त्यामुळे नंदीध्वजाच्या वरील बाजूस असलेल्या खेळण्यास आग लागली. परंतु भक्तांनी वेळीच ही आग विझवली. ही घटना आजोबा गणतीजवळ रविवारी रात्री सुमारे 9.30 च्या सुमारास घडली. नंदीध्वजाला लावलेल्या साहित्यास शॉर्टसर्किटने वरच्या भागाला धग लागली होती. लागलीच नंदीध्वज खाली घेऊन तो बदलण्यात आला.  यामध्ये कोणतीही हानी झाली नाही.  

 नवीन नंदीध्वज आणून त्याला लगेच नागफणा तयार करून बांधण्यात आला. यासाठी सर्व सिद्धेश्‍वर भक्तांनी गतीने धडपड करीत अडीच तासांत नागफणी नंदीध्वज पुन्हा सजवला. अतिशय शांततेमध्ये कोणतीही गडबड न होऊ देता हा बदल घडवला.  

त्यानंतर ‘शिव बोला... हर्रऽऽ’च्या जयघोषात व त्याच उत्साहात मिरवणूक होम मैदानाकडे मार्गस्थ झाली. होमप्रदीपनासाठी सर्व काठ्या रात्री पावणेबाराच्या सुमारास मार्गस्थ झाल्या. पोलिस, विद्युत मंडळ, अग्निशमन दलाने तातडीने हालचाली करून परिस्थिती हाताळली. मध्यरात्री दीड वाजता नंदीध्वज होम मैदानावर पोहोचले. होमहवन विधीसाठी रविवारी सायंकाळी सुरू झालेल्या नंदीध्वजांच्या मिरवणुका रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या. मध्यरात्री 1.30 च्या सुमारास हे नंदीध्वज होम मैदानावर पोहोचले.

वासराची भाकणूक

ग्रामदैवत श्री सिद्धेश्‍वर यात्रेच्या तिसर्‍या दिवशी होमविधी पार पडल्यानंतर नंदीध्वज भगिनी समाजजवळ आले असता तेथे सोमवारी पहाटे 3 वाजून 10 मिनिटांनी देशमुख यांच्या घरातून आणलेल्या वासराची भाकणूक झाली.  वासरासमोर गूळ, गाजर, ऊस, तांदूळ, गहू यासह विविध वस्तू ठेवण्यात आल्या होत्या. 

यावेळी वासराने गाजर, सुपारी, ऊस या वस्तूंना स्पर्श केला. त्यावरून लाल वस्तू महागतील तसेच वासराने मलमूत्र विसर्जन केले नसल्यामुळे गतवर्षीप्रमाणेच यंदाही मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल तसेच वासरू घाबरल्यामुळे भयाचे वातावरण राहील, असे संकेत असल्याचे मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी सांगितले.