होमपेज › Solapur › सोलापूर जिल्ह्यात भगवा फडकविण्यासाठी प्रयत्न करणार : जिल्हाप्रमुख वानकर

सोलापूर जिल्ह्यात भगवा फडकविण्यासाठी प्रयत्न करणार : जिल्हाप्रमुख वानकर

Published On: Aug 25 2018 11:33PM | Last Updated: Aug 25 2018 11:28PMसोलापूर ः प्रतिनिधी

शहर-जिल्ह्यात अकरा विधानसभेच्या जागांपैकी फक्त करमाळा विधानसभेत शिवसेनेचा आमदार आहे. तरीही येणार्‍या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सर्व अकरा विधानसभा मतदारसंघांवर शिवसेनाचा भगवा फडकविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन  नूतन जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांनी केले. 

निवड झाल्यानंतर त्यांनी शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेऊन संवाद साधला. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या विश्‍वासाला साजेसे असे काम करून ठाकरे कुटुंबीयांचा विश्‍वास सार्थ ठरवितानाच नूतन जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघांत शिवसेनेची सत्ता आणण्याचा आटोकाट प्रयत्न असणार असल्याचे सांगितले.

पक्षातील गट-तट आणि अंतर्गत गटबाजीविषयी विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना नूतन जिल्हा संपर्कप्रमुखांकडे सर्वांची कुंडली असून  त्यांच्या आणि जिल्हाप्रमुख महेश कोठे, संभाजी शिंदे यांच्या मदतीने शिवसेना वाढविण्यासाठी प्रयत्न होणार असल्याचे सांगितले.

लवकरच गटप्रमुख, तालुकाप्रमुख यांचे तालुका पातळीवर मेळावे, बैठका घेणार आहोत. सप्टेंबरमध्ये शहर-जिल्ह्याचा मोठा मेळावा घेण्याचे नियोजन चालू आहे. पक्षाची ताकद वाढत असून अनेकजण, समविचारी  पक्ष शिवसेनेत येऊन काम करण्यासाठी इच्छुक आहेत. यावर वरिष्ठ पातळीवर चर्चा चालू आहे. जुन्या आणि नवीन पदाधिकार्‍यांचा समन्वय साधून नवीन टीम तयार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यात एकेकाळी करमाळा, बार्शी, दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर तालुक्यांमध्ये शिवसेनेचे आमदार निवडून आले आहेत. पक्षातील निष्ठेमुळेच काही महिन्यांपूर्वी जिल्ह्याच्या युवासेनेचे राज्य विस्तारक म्हणून, तर आता शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणून आपली निवड झाली असून ठाकरे कुटुंबियांनी मोठी जबाबदारी टाकल्याचे सांगितले. 

यावेळी शहरप्रमुख प्रताप चव्हाण, परिवहन सभापती तुकाराम मस्के, काका देशमुख, महेश धाराशिवकर, लहू गायकवाड, वजीर शेख, विठ्ठल वानकर, सुनील साळुंखे, महेश देशमुख, विक्रांत काकडे, खंडू सलगरकर, शिवाजी नीळ, दादासाहेब पवार यांची उपस्थिती होती.