होमपेज › Solapur › न्यूयॉर्कमध्ये शिवरायांचा जयघोष

न्यूयॉर्कमध्ये शिवरायांचा जयघोष

Published On: Feb 22 2018 1:23AM | Last Updated: Feb 21 2018 9:06PMसोलापूर : प्रतिनिधी 

न्यूयॉर्क येथील छत्रपती फाऊंडेशनच्यावतीने भारतीय दूतावासामध्ये अधिकृतपणे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येऊन छत्रपतींचा जयघोष करण्यात आला. 
न्यूयॉर्क येथील भारतीय दूतावासामध्ये   झालेल्या  या कार्यक्रमास कौन्सिल जनरल ऑफ इंडियाचे  प्रतिनिधी  के. डी. नायर यांच्या हस्ते छत्रपतींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.  यावेळी  कार्यक्रमाचे प्रास्ताविक छत्रपती फाऊंडेशनचे अध्यक्ष  विनोद झेंडे यांनी करून छत्रपती फाऊंडेशनची भूमिका व कार्यप्रणालीची माहिती दिली. 

त्यानंतर अक्षय नाईक यांनी शिवचरित्रावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. स्वप्निल खेडेकर यांनी शिवविचार, आधुनिक युगातील शिवाजी, छत्रपती फाऊंडेशन व युवकांमध्ये समन्वय या विषयांवर विचार व्यक्त केले. 

याप्रसंगी बोलताना प्रमुख पाहुणे नायर म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सर्वप्रथम न्यूयॉर्कमध्ये अधिकृतपणे साजरी होणे हा इतिहास आहे. छत्रपतींच्या जयंतीसाठी हे सभागृह नवयुवकांनी भरलेले असल्याबाबत कौतुक करून पुढील वर्षी शिवजयंती ही अधिक मोठ्या प्रमाणावर साजरी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे आश्‍वासन दिले. यावेळी बोलताना दिलीप म्हस्के यांनी  सर्व  समतावादी चळवळीचे मूळ हे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. त्यामुळे यूएनमध्ये सामूहिकरित्या छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी छत्रपती फाऊंडेशनच्या  कार्याचा  गौरव  करताना  किशोर गोरे यांनी शिवजयंतीचा आंतरराष्ट्रीय स्तरावर इतिहास लिहिला जाईल  त्यावेळी  छत्रपती  फाऊंडेशनचा उल्लेख करावाच लागेल, असे सांगितले. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस, खा. सुप्रिया सुळे, विनायक मेटे, पुरुषोत्तम खेडेकर यांनी शिवजयंतीपर दिलेल्या संदेशची व्हिडिओ क्लिप दाखविण्यात आली. या कार्यक्रमात छत्रपती फाऊंडेशनच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.