होमपेज › Solapur › शाळेचा पहिला दिवस; कुठे हसू तर कुठे आसू!

शाळेचा पहिला दिवस; कुठे हसू तर कुठे आसू!

Published On: Jun 15 2018 10:35PM | Last Updated: Jun 15 2018 8:37PMसोलापूर : प्रतिनिधी 

मम्मी-पप्पांनी शाळेच्या गेटवर चिमुकल्यांचा हात सोडताच कुणी अक्षरशः भोकाड पसरून रडायला सुरुवात केली, तर कुणी अगदी उड्या मारत टाटा-बाय बाय करत नव्या मित्र-मैत्रिणींसह शाळेचा पहिला दिवस फुल्ल एंजॉय केला. मुलांच्या स्वागतासाठीही बहुतांश शाळांनी रांगोळ्याच्या पायघड्या, फुगे, खाऊ अशी जंगी तयारी केली होती. अशा अतिशय उत्साही वातावरणात आज कुठे हसू तर कुठे आसूने शाळेच्या पहिल्या दिवसाला सुरुवात झाली.

 उन्हाळ्याच्या प्रदीर्घ सुट्टीनंतर आज जिल्ह्यातील सर्व शाळा एकाच दिवशी सुरु झाल्या. त्यामुळे एरव्ही आठ-नऊपर्यंत घरात झोपून राहणारी लेकरं आज मात्र भल्या सकाळी उठून शाळेच्या तयारीला लागली. चौकाचौकात ठरलेल्या स्टॉपवर महिना दोन महिन्यांनी आज पुन्हा स्कूलबस आणि त्यात सुरु असलेला मुलांचा दंगा दिसायला लागला. 

पहिल्यांदाच शाळेत चाललेल्या अनेक चिमुकल्यांच मात्र पालकांसह  शिक्षकांनाही विशेष कौतुक होतं. त्यामुळे त्यांच्यासाठी तर घरात पालकांनी आणि शाळेत शिक्षकांनी जंगी तयारी केली होती. सिद्धेश्‍वर शाळेमध्ये मुलांसाठी पायघड्या आणि फुगे देऊन स्वागत करण्यात आले तर दमाणीमध्ये मुलांना पोट धरून हसायला लावणारा चार्ली चॅप्लीन अवतरला, इंडियन मॉडेल स्कूलमध्ये मुलांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या शाळामंध्ये तर पोरांची बग्गीमध्ये बसवून प्रभात फेरी काढण्यात आली.  शाळेच्या पहिल्या दिवसामुळे सर्वच शाळा गजबजल्या होत्या.