Wed, Jul 17, 2019 00:16होमपेज › Solapur › वडील ‘बेटा’ म्हणूनच हाक मारतात 

वडील ‘बेटा’ म्हणूनच हाक मारतात 

Published On: Jan 29 2018 11:25PM | Last Updated: Jan 29 2018 10:32PMसोलापूर : प्रतिनिधी

मुलगी असूनही वडील आपल्याला कायम ‘बेटा’ अशीच हाक मारतात तसेच मुलगी असूनही मी माझ्या आई-वडिलांना सांभाळते, याचा मला अभिमान वाटतो, अशा भावना केगाव येथील पोलिस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्या पोलिस अधीक्षक कविता नेरकर-पवार यांनी व्यक्‍त केल्या. 

जुळे सोलापूर बहुउद्देशीय समाजसेवी संस्था व शांती इंग्लिश मीडियम स्कूल व ज्यु. कॉलेज यांच्या संयुक्‍त विद्यमाने राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त आयोजित सेव्ह गर्ल चाईल्ड पोस्टर स्पर्धेच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात त्या बोलत होत्या. वैद्यकीय अधिकारी डॉ. मंजिरी कुलकर्णी, संस्थेच्या प्राचार्या रजुला मॅक यांची प्रमुख उपस्थिती होती. 
आपण कुठेही आपल्याला कमी समजू नये असे सांगून नेरकर-पवार म्हणाल्या की, आपण सर्व विशेष आहोत म्हणूनच निसर्गानेही आपल्याला पुनर्निर्मितीचा अधिकार दिलेला आहे.  सोलापुरात आज अनेक पदांवर महिला विराजमान असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या मोठ्या जबाबदार्‍या त्या उत्कृष्टरितीने पार पाडत आहेत. यावेळी त्यांनी आपल्या शिक्षण व पोलिस दलाच्या सेवेतील अनेक आठवणी सांगितल्या. 

प्रारंभी शांती इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या रजुला मॅक यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. जुळे सोलापूर बहुउद्देशीय संस्थेच्या सचिव प्रा. पल्‍लवी तडकल यांनी पोस्टर स्पर्धेबाबतची संकल्पना स्पष्ट केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व पाहुण्यांचा परिचय बळवंत जोशी यांनी करून दिला.

या प्रदर्शनाला  मनपाचे उपायुक्‍त त्र्यंबक ढेंगळे-पाटील, करमाळा न.प.चे मुख्याधिकारी पंकज जावळे, अक्षर तज्ज्ञ  अभिजित भडंगे यांनी भेट देऊन सहभागी शिक्षिकांच्या निर्मिती कलेचे कौतुक केले.   सेव्ह गर्ल चाईल्ड पोस्टर स्पर्धेत 80 शिक्षिकांनी सहभाग नोंदविला होता. यात स्वाती कामशेट्टी यांना प्रथम, सुप्रिया गुंड यांना द्वितीय, तर रोहिणी पानपाटील यांना तृतीय क्रमांकाने सन्मानित करण्यात आले. सविता पाटील, प्रतीक्षा कुलकर्णी, भाग्यश्री जमदाडे, पल्‍लवी देशपांडे, शर्वरी इराबत्ती यांना उत्तेजनार्थ पुरस्कार  देण्यात आले. चित्रकार विठ्ठल मोरे, रामचंद्र हक्के यांनी परीक्षक म्हणून काम केले.